मुंबई- पुणेकरांची 'फेव्हरेट' असलेली 'डेक्कन क्वीन' सहा महिन्यानंतर ट्रॅकवर धावली...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 12:07 PM2020-10-10T12:07:32+5:302020-10-10T12:13:11+5:30
डेक्कन क्वीन ही पुणे व मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची अत्यंत आवडती गाडी आहे.
पुणे : रेल्वेच्या शिरपेचातील तुरा असलेली डेक्कन क्वीन शनिवारी पुणेरेल्वे स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली. ही गाडी मुंबईतून शुक्रवारी पुण्यात दाखल झाली. लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून ही गाडी यार्डातच होती. दरम्यान, पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प असून केवळ २५० च्या जवळपास आरक्षण करण्यात आले होते.
डेक्कन क्वीन ही पुणे व मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची अत्यंत आवडती गाडी आहे.
लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांनी ही गाडी धावणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे रेल्वेकडून इंद्रायणी एक्सप्रेसही सोडण्यात येणार आहे. डेक्कन क्वीन शुक्रवारी रात्री पुणे स्थानकात दाखल झाली. ही गाडी शनिवारी सकाळी नियमित वेळेत मुंंबईकडे रवाना झाली. तत्पुर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप, रेल्वे अधिकारी व प्रवाशांकडून गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
दरम्यान, पहिलाच दिवस असल्याने मुंबईतून आलेल्या डेक्कन क्वीनला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. केवळ १८७ प्रवाशांनी आरक्षण केले होते. तसेच शनिवारी मुंबईला जाणाऱ्या गाडीलाही फारसा प्रतिसाद नाही. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास २०० प्रवाशांनीच आरक्षण केले होते. पुण्यातून सायंकाळी मुंबईला गेलेल्या इंद्रायणी एक्सप्रेसलाही केवळ २४० प्रवाशांनीच आरक्षण केले होते. या दोन्ही गाड्यांचे प्रवासी क्षमता प्रत्येकी १४५० एवढी आहे.
-----------------
पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी असु शकतो. पण पुढील काही दिवसात प्रवाशांचा प्रतिसाद वाढत जाईल, याची खात्री आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग
-----------