लोणावळा स्थानकात डेक्कन क्विन 20 मिनिटे रोखली; शेकडो नागरिक उतरले रेल्वे ट्रॅकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:08 AM2024-01-12T10:08:46+5:302024-01-12T10:09:51+5:30
डेक्कन क्विन रोखल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अन्य गाड्या काही काळ उशिराने धावल्या. लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर आंदोलनाचा परिणाम झाला नाही.
लोणावळा :लोणावळा-पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या पूर्ववत करा, सर्व एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकात पूर्वीप्रमाणे थांबा द्या, या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज लोणावळा शहर व ग्रामीण भागातील जागरूक नागरिकांच्या वतीने लोणावळा रेल्वे स्थानकासमोर रेल्वे रोको आंदोलन करत मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्विन ही गाडी तब्बल 20 मिनिटे रोखून धरली होती. शेकडो नागरिक रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी रेल्वे स्थानकावर जमले होते. अखेर रेल्वे पोलीसांच्या विनंतीला मान देत आंदोलनकर्ते रेल्वे ट्रॅक मधून बाजूला झाले. यावेळी स्टेशन मास्तर रजपूत यांनी रेल्वे प्रशासनाच्या वतीने निवेदन स्विकारत रेल्वे प्रशासनाकडून आलेल्या सूचनेनुसार दुपारच्या वेळेतील बंद असलेल्या लोकल सुरू करण्याचे तसेच पाच एक्सप्रेस गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे आश्वासन दिले. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार येत्या दहा दिवसांत गाड्यांना थांबा व लोकल सेवा सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा व मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या आडवण्याचा इशारा लोणावळाकर नागरिकांनी दिला आहे. सोबतच येत्या आठ दिवसाच्या आत रेल्वेचे व्यवस्थापक (DRM) यांच्याशी बैठक लावण्याची मागणी केली आहे.
आज सकाळी सात वाजल्यापासून लोणावळ्यातील जयचंद चौकात लोणावळा शहर व ग्रामीण भागातील जागरूक नागरिक एकत्र जमायला सुरुवात झाली. साडेसात वाजता मोठ्या संख्येने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत नागरिक रेल्वे स्थानकावर पोहचले, त्या ठिकाणी रेल्वे पोलीस व लोणावळा शहर, ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. 8.10 वाजता डेक्कन क्विन गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना आंदोलनकर्ते रेल्वे ट्रॅक वर उतरत थेट रेल्वे इंजिनवर चढले, काही जण ट्रॅक वर जाऊन बसले. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तो पर्यंत आमच्या डेक्कन क्विन जाऊ देणार नाही, असा पवित्रा जागरूक नागरिकांनी घेतला. सुरुवातीला रेल्वे पोलीस दलाने बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक मधून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने परत परत ट्रॅक वर येत असल्याने अखेर लोणावळा पोलिसांनी विनंती करत आंदोलकर्ते यांना ट्रॅक वरून बाजूला होत, गाडी जाऊ द्यावी असे सांगितल्यानंतर आंदोलनकर्ते बाजूला झाले. त्याठिकाणी आलेल्या रेल्वे अधकाऱ्यांना स्टेशनवर निवेदन देण्यात आले. महिला देखील या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने देखील जन भावनेचा आदर करत कोरोना पूर्वी थांबत असलेल्या सर्व गाड्यांना लोणावळ्यात थांबा द्यावा व लोकल सेवा सुरू करावी.
आंदोलन संपल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. डेक्कन क्विन रोखल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अन्य गाड्या काही काळ उशिराने धावल्या. लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर आंदोलनाचा परिणाम झाला नाही.
खासदार - आमदारांनी फिरवली आंदोलनाकडे पाठ
लोणावळा शहर व ग्रामीण भागातील जागरूक नागरिकांनी लोणावळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे रेल्वे प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे होणारे हाल थांबण्यासाठी आज लोणावळ्यात रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनाकडे मावळचे खासदार, मावळचे आमदार व माजी आमदार, लोणावळा माजी नगराध्यक्षा या सर्वांनी पाठ फिरवली. जागरूक नागरिक हे आंदोलन करत असताना लोकप्रतिनिधी मात्र त्याकडे फिरकले नाहीत. तर लोकसभा व विधानसभेसाठी इच्छुक असलेले मावळ व पिंपरी चिंचवड भागातील नेते मंडळी नागरिकांच्या आंदोलनात सहभागी झाली होती.