डेक्कन क्वीनची ‘ती’वर जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 01:11 AM2019-03-09T01:11:15+5:302019-03-09T01:20:41+5:30
दररोज पुणे-मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचे सारथ्य शुक्रवारी महिलांनी केले.
पुणे : दररोज पुणे-मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचे सारथ्य शुक्रवारी महिलांनी केले. तसेच तिकीट तपासणीस, सुरक्षारक्षक आणि तांत्रिक जबाबदारीही महिला कर्मचाऱ्यांवर सोपवून त्यांचा सन्मान करण्यात आला. निमित्त होते, जागतिक महिला दिनाचे.
मध्य रेल्वेच्या वतीने दरवर्षी महिला दिनानिमित्त महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याअंतर्गत शुक्रवारी डेक्कन क्वीनची जबाबदारी महिला कर्मचाºयांवर सोपविण्यात आली होती. सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी ही गाडी पुणे रेल्वे स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली. या वेळी गाडीचे सारथ्य महिला चालकांनी केले. तसेच गाडीची तांत्रिक व सुरक्षेची जबाबदारीही महिलांवर सोपविण्यात आली होती. तसेच मागील काही महिन्यांपासून फलाट क्रमांक पाचवरून सुटणारी डेक्कन क्वीन शुक्रवारी फलाट क्रमांक एकवरून सोडण्यात आली. महिला दिनानिमित्त दख्खनच्या राणीला हा मान देण्यात आला.
यानिमित्त रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी रेल्वे स्थानकावर सकाळी साडेसहा वाजता विशेष कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. महिला कर्मचारी व प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त डिझेल लोको शेडमधील ५५ महिला कर्मचाºयांनी श्ोडच्या भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी केली.