डेक्कनचा यशवंतराव चव्हाण पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 07:44 PM2024-02-03T19:44:04+5:302024-02-03T19:44:53+5:30
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे....
पुणे : डेक्कन जिमखाना भागातील यशवंतराव चव्हाण पूल दुरुस्तीच्या कामासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण पुलाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. २९ फेब्रुवारीपर्यंत पुलाचे बेअरिंग आणि एक्सपान्शन जॉईंट बदलण्यात येणार आहे. त्यामुळे पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
नवी पेठेतील पूना हॉस्पिटलकडे डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी गांजवे चौकातून टिळक चौक, छत्रपती संभाजी पूल (लकडी पूल), खंडोजीबाबा चौक या मार्गाचा वापर करावा. कर्वे रस्त्यावरून नवी पेठेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खंडोजीबाबा चौक, छत्रपती संभाजी पूल, खंडोजीबाबा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन उपायुक्त बोराटे यांनी केले आहे.