Pune | रुपीच्या ठेवीदारांना पाच लाख मिळण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 03:44 PM2022-12-21T15:44:47+5:302022-12-21T15:44:55+5:30
मुदतीत अर्ज सादर न केल्यास ठेवींची रक्कम मिळण्यास अडचणी येऊ शकतात...
पुणे : रुपी सहकारी बँकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज करणे अपेक्षित आहे. या मुदतीत अर्ज सादर न केल्यास ठेवींची रक्कम मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ठेवीदारांनी अर्ज सादर करावेत, अशी माहिती रुपी बँकेचे अवसायक धनंजय डोईफडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत घेण्यासाठी अद्याप अर्ज न केलेल्या ठेवीदारांनी संबंधित शाखेशी त्वरित संपर्क करावा. ठेवीदारांनी आवश्यक पूर्तता करून योग्य कागदपत्रांसह बँकेच्या कोणत्याही शाखेत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत, अन्यथा रुपी बँक जबाबदार राहणार नाही. डोईफोडे म्हणाले की, ठेवीदारांनी शाखेत अर्ज करायचा आहे. शाखेतून अर्ज छाननी करून मुख्य कार्यालयात पाठविणार आहे. आतापर्यंत सुमारे ९ ते १० हजार अर्ज आले आहेत. पंधरा ते वीस हजार अर्ज येणे अपेक्षित आहे. सध्या काही खातेदार मयत झालेले असू शकतात, काहींचे मुले परदेशात असतील. त्यामुळे अर्ज कमी येत असावेत, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
आम्ही केंद्रीय मंत्रालयाच्या वित्त विभागाशी संपर्क साधून आहोत. आमची त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. त्यामुळे खातेदारांनी जर बँकेकडे पाच लाखांसाठी अर्ज केला, तर त्यांना नंतर क्लेम करता येणार नाही. म्हणून अनेकजण थांबले आहेत. चांगला पर्याय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
- धनंजय कानझोडे, रुपी बँक खातेदार, ठेवीदार कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष