जेलमध्येच ठरलं घरफोडी करू...! १२ लाखांची चोरी, दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:22 AM2023-10-19T10:22:05+5:302023-10-19T10:22:44+5:30
पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या दागिन्यांसह १२ लाख १ हजार ६३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच गुन्हे उघडकीस आणले
पुणे: जेलमधील साथीदाराला सोडवण्यासाठी घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट - २ ने अटक केली. त्यांच्याकडून २०० ग्रॅम सोन्याचे आणि ३०० ग्रॅम चांदीचे दागिने, असा १२ लाख १ हजार ६३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंकुश राम गोणते (३२), हर्षद गुलाब पवार (३०, दोघेही रा. दत्तनगर, सुतारदरा, कोथरूड), अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपी अंकुश गोणते हा खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. यादरम्यान त्याची ओळख अट्टल घरफोडी करणारा हर्षद पवार सोबत झाली. या दोघांनी जामिनावर सुटल्यावर घरफोडी करण्याचे ठरवले होते. दरम्यान, अंकुश गोणते हा जामिनावर जेलबाहेर आला, त्याने हर्षद पवार याला जामिनावर सोडण्यासाठी घरफोडी केली होती. त्यानंतर हर्षद पवार याची जामिनावर सुटका होताच दोघांनी मिळून पुणे शहर व सातारा जिल्ह्यात घरफोडी आणि चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी चोरीच्या दागिन्यांसह अंकुश गोणते आणि हर्षद पवार यांच्याकडून १२ लाख १ हजार ६३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-२ चे पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार गजानन सोनुने, अमोल सरडे आणि पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.