धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अपील करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:09 AM2021-01-22T04:09:59+5:302021-01-22T04:09:59+5:30
--------------------------- पुणे : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मानाचा मुजरा कार्यक्रमासाठी झालेला दहा लाख ७८ हजार रुपयांचा ...
---------------------------
पुणे : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मानाचा मुजरा कार्यक्रमासाठी झालेला दहा लाख ७८ हजार रुपयांचा वाढीव खर्च महामंडळाला परत करण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. मात्र, हा निर्णय देताना आमची बाजू मांडण्याची त्यांनी संधी दिली नाही. त्यामुळे या निर्णयाला आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती अभिनेते विजय पाटकर, अभिनेंत्री प्रिया बेर्डे यांनी आज दिली.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने २०१० ते २०१५ या कालावधीत घेतलेल्या ‘मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये वाढीव खर्च झाला होता. त्याविरोधात महामंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी धर्मादाय कार्यालयात तक्रार केली होती. त्याचा निर्णय देताना धर्मादाय आयुक्तांनी तत्कालीन कार्यकारिणीनेही खर्च केलेली वाढीव रक्कम महामंडळाला परत करावी, असा आदेश दिला आहे. या कार्यकारिणीमध्ये अलका कुबल, विजय पाटकर, प्रिया बेर्डे आदींचा समावेश होता. त्याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी आज विजय पाटकर, प्रिया बेर्डे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मिलिंद अष्टेकर, धमाजी यमकर, रणजीत जाधव, ॲड. सत्यपाल लोणकर, इम्तीयाज बारगीर उपस्थित होते.
पाटकर म्हणाले की, ‘मानाचा मुजार’ या कार्यक्रमाता वाढीव खर्च झाला त्याचा हिशेब आम्ही कार्यकारिणीत सादर केला त्यालाही मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्याचे ऑडिटर कडूनही त्याचे ऑडिट झाले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून येणाऱ्या कलाकारांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करताना हा वाढीव खर्च झाला होता, तो कोणाच्याही वैयक्तिक कारणासाठी खर्च झालेला नाही. मात्र, तरी देखील आकसापोटी ही तक्रार दाखल झाली आणि आयुक्तांनीही आम्हाला बाजू मांडायची संधी न देता थेट निर्णय दिला आहे. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याबाबत दाद मागू.
--
चौकट
निवडणुकीमुळे राजेभोसलेंकडून आकसाचे राजकारण
चित्रपट महामंडळाची निवडणूक जवळ आली आहे, त्या निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा एकदा जोमाने तयारी करत आहोत. त्याच्याच आकसापोटी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडून हे राजकारण केले जात आहे. या खर्चाला मंजुरी मिळाली असताना व त्याचे ऑडिट झालेले असतानाही काही सद्स्यांना हाताशी धरून त्यांनी अशा तक्रारी करायला लावल्या आहेत. मात्र त्यातील तक्रारदारच आता त्यांच्यावर आरोप करत असल्याने त्यांच्या आकसाचे राजकारण उघड झाले असल्याचा आरोपही विजय पाटकर व प्रिया बेर्डे यांनी केला.
--