कंत्राटी कर्मचाऱ्यांचा निर्णय संबंधित विभागांनी घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:29+5:302021-05-27T04:11:29+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढील काळात कामावर ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढील काळात कामावर ठेवावे किंवा ठेवू नये, या संदर्भातील निर्णय संबंधित विभागाने घ्यावा, अशा आशयाचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विद्यापीठातील काही विभाग अशैक्षणिक कामांसाठी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या कर्मचाऱ्यांचे मानधन त्या त्या विभागाकडून दिले जात होते. संबंधित कर्मचाऱ्यांचा कालावधी संपल्यानंतरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून विद्यापीठाने या कर्मचाऱ्यांना काही महिने मानधन दिले होते. सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या त्या त्या विभाग प्रमुखांनी केलेल्या आहेत. मात्र, कोरोना काळात या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे किंवा नाही हे तपासून संबंधित विभागाने आपल्या पातळीवर निर्णय घ्यावा. येत्या १ जूनपासून विद्यापीठ प्रशासन या कर्मचाऱ्यांची कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
------------
कोरोनामुळे कर्मचाऱ्यांवर संक्रांत ?
विद्यापीठातील विभागांतर्फे काही महिन्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सातत्याने मुदतवाढ देऊन कामावर ठेवले जात होते; परंतु कोरोनामुळे विद्यापीठातील सर्व विभाग सध्या बंद आहेत. परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित विभागांनी निर्णय घ्यावा, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.