वणव्यावर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालणार वन विभागाच निर्णय : वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:39+5:302021-02-12T04:11:39+5:30
कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो ...
कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. सध्या हिवाळा असतानाही वणवा कसा लागतो ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे वणवे मानवनिर्मित असण्याची दाट शक्यता आहे. खरंतर वणव्याने डोंगरावरील, वनातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी नष्ट होतात. विशेषत: औषधी वनस्पतीही नामशेष होतात. वणवा डोंगर व जंगल उजाड करतो. झाडांचा बळी घेतो. नवीन रोपे व बी नष्ट करतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतो. पाण्याचे प्रवाह कोरडे करतो. निसर्गाची व वन्यजीवांची अपरिमित हानी होते यात अनेक दुर्मीळ प्रजाती नष्ट होतात, या विषयी जागृती करणे आवश्यक आहे.
वणव्याची मानवनिर्मित कारणे :
* मोहाची फुले वेचताना जमिनीवरील पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावतात.
* शेतातील गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज असल्याने अनेकजण गवत पेटवतात.
* वन क्षेत्राशेजारी शेती असेल तर तेथेही जमीन स्वच्छ करण्यासाठी आग लावली जाते.
* वन क्षेत्रात किंवा जंगलात पर्यटनासाठी आलेले पर्यटक, जंगलात फिरणारे गुराखी व इतर विडी, सिगारेट आगकाडीचे थोटूक फेकून देतात. त्याने आग लागते. मध जमा करणारे टेंभे घेऊन जातात आणि तिथेच टाकतात.
-----------------------
नैसर्गिक कारणे
* विजेच्या तारा एकमेकांना चिकटून ठिणग्या गवतावर पडतात आणि वणवा पेटतो.
---------------------
पारंपरिक उपाय अपुरे
झाडाची फांदी तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो. आगीचा इशारा देणारे सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळू शकते. तसेच उपग्रहाद्वारे वणवा लागल्याबरोबर इशारा देणारी यंत्रणा आहे. पण याचा अधिक उपयोग करायला हवा. तसेच ब्लोअर यंत्राचा वापर होतो. पण त्याचा ही फायदा होत नाही.
------------
शहर परिसरातील आणि टेकडीवरील वन क्षेत्रावर वणवा लागल्यास त्वरित माहिती मिळावी, यासाठी काही संस्थांनी व्हॉट्सॲप ग्रुप केले आहेत. त्याद्वारे आम्हाला लगेच माहिती समजते. नागरिकांनीही १९२५ या टोल फ्री वर फोन करून वणवा पेटल्याची माहिती द्यावी.
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे विभाग
----------------------