उत्पन्नवाढीसाठी महापालिकेच्या मिळकती भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:27+5:302021-07-21T04:09:27+5:30
पुणे : महापालिकेचे उत्पन्नवाढीसाठी अॅमिनेटी स्पेस भाड्याने देणे, सदनिका विक्री आदी नियोजन करण्यात येत असतानाच, आज महापालिकेच्या १३ मिळकतींपैकी ...
पुणे : महापालिकेचे उत्पन्नवाढीसाठी अॅमिनेटी स्पेस भाड्याने देणे, सदनिका विक्री आदी नियोजन करण्यात येत असतानाच, आज महापालिकेच्या १३ मिळकतींपैकी भाडेतत्त्वावर दिलेल्या काही मिळकतींना मुदतवाढ देण्याबरोबर नव्याने काही मिळकती भाडेतत्त्वावर देण्याबाबतचे विषय सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले़
डिसेंबर, २०१९ पासून ते मार्च, २०२१ पर्यंतच्या विविध कार्यपत्रिका आज सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या होत्या़ यातील मंजूर न झालेले विषय यावेळी चर्चेसाठी घेण्यात आले़ यामध्ये विविध १४ मिळकती या महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी भाडेतत्त्वावर देण्याबरोबर काहींना मुदतवाढीचे विषय प्रशासनाकडून मान्यतेसाठी दाखल करण्यात आले होते़
ऑनलाईन पध्दतीने पार पडलेल्या या सभेत मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी या मिळकतींचा तपशील सादर करून, महापालिकेला या रिक्तअसलेल्या इमारतींमधून (मिळकती) लाखो रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणार असल्याची माहिती दिली. यात औंध जकात नाक्याची जागा पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) भाडेतत्वावर दिल्यास वर्षाला ६९ लाख १७ हजार रूपये उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले. एरंडवण्यातील ऑफिस गाळे जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास मुदतवाढ देऊन देण्याबाबतच्या प्रस्तावासह, शहराच्या मध्यवर्ती भागातील ११ मिळकतींची माहिती देऊन त्यास मान्यता घेण्यात आली़
-----------------------------------