साखर क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी; शरद पवारांची अपेक्षा
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: September 18, 2022 02:17 PM2022-09-18T14:17:43+5:302022-09-18T14:18:03+5:30
साखर निर्यातीमध्ये भारत जगात अव्वल असला, तरी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यायला हवा
पुणे : साखर निर्यातीमध्ये भारत जगात अव्वल असला, तरी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यायला हवा. साखर धंद्यात अधिक संशोधन व्हावे आणि त्यासाठी मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. साखर उत्पादनातील संशोधनासाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी. आतापर्यंत तशी तरतूद केलेली ऐकण्यात नाही. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.
द डेक्कन शुगर टेक्ना‘ला‘जीट्स असोसिएशनतर्फे (डीएसटी) आयोजित दोन दिवसीय वार्षिक साखर परिषदेचे उद्घाटन पुण्यात रविवारी सकाळी झाले. त्याप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमास डीएसटीचे अध्यक्ष एस. एस. गंगावती, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीचे उपाध्यक्ष एस. बी. भड, वार्षिक सभेच्या कमिटीचे चेअरमन एस. एस. शिरगावकर, प्रशांत परिचारक, प्रभाकर कोरे, उपाध्यक्ष (तांत्रिक) व्ही. पी. शिंदे, गौरी पवार आदी उपस्थित होते.
पर्यावरणाच्या समस्येवर लक्ष हवे
ऊसाचे उत्पादन वाढविताना दुसरीकडे पर्यावरणातील बदल आणि त्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रीय करायला हवे. कारण ते समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत आपण हवामानाचे बदल पाहत आहोत. एकीकडे साखर उत्पादन वाढविताना दुसरीकडे मातीची गुणवत्ता, जलसंवर्धन या गोष्टींवरही लक्ष द्यायला हवे, असे पवार म्हणाले.
ब्राझीलचे इथेना‘लवर अधिक लक्ष
ब्राझील हा देश साखर उत्पादनात अग्रेसर असला, तरी ते इथेना‘ल वर जास्त लक्ष देतात.मी ब्राझिलच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. त्यांचे अधिक लक्ष हे साखरेपासून इथेना‘ल अधिक कसे तयार करता येईल,यावर आहे. त्यासाठी ते काम करत आहेत. भारताने त्याबाबत विचार करावा, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.