महापालिकेत सत्ता आणण्याचा ‘राष्ट्रवादी’चा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:17+5:302021-06-10T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पक्षाकडे राज्यातील सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, सलग १० वर्षे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पक्षाकडे राज्यातील सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, सलग १० वर्षे असलेली पुणे महापालिकेतील सत्ता गेल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांना आहे. ही सत्ता पुन्हा मिळवण्याचा निर्धार पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी कार्यकर्ते व्यक्त करणार आहेत.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने पक्ष कार्यालय टिळक रस्त्यावरील गिरे बंगल्यातून स्थलांतरित होणार आहे. येत्या १९ जूनला पक्ष कार्यालय महापालिकेशेजारच्या ५ हजार फुटांच्या सुसज्ज कार्यालयात थाटले जाणार आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली.
जगताप यांच्यासह ‘राष्ट्रवादी’च्या बहुतांश पदाधिकारी-कार्यकर्त्यांना महापालिकेतील १० वर्षांची सत्ता गेल्याची खंत ४ वर्षांनंतरही मिटवता आलेली नाही. विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या २ जागा ‘राष्ट्रवादी’ने भाजपकडून खेचून आणल्या. मात्र, तरीही ‘राष्ट्रवादी’ची खरी नजर महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यावरच आहे.
या दृष्टीने अजित पवार आतापासूनच मोर्चेबांधणी करू लागले आहेत. माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा देऊन त्यांनी याची सुरुवात केली. त्याचबरोबर प्रभाग एक सदस्याचा की दोन याचाही धुरळा उडवून दिला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच नुकसान झाल्याचे ‘राष्ट्रवादी’च्या प्रमुख नेत्यांच्या डोक्यात पक्के बसले आहे. त्यामुळे या वेळी आधीच चार सदस्य रद्दचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घेतला आहे.
पुण्याच्या पेठांमध्ये बळ वाढवण्याची सूचना पवारांनी केली आहे. मेळावे, बैठका, संघटन, जुन्या कार्यकर्त्यांना सामावून घेणे, अशा उपक्रमांबरोबरच महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेण्याची सूचना त्यांनी नगरसेवकांना केली आहे. त्यानुसार काम सुरू असल्याचे जगताप सांगतात.
चौकट
“पक्षाच्यावतीने गुरुवारी (दि. १०) सकाळी हिराबाग येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण होईल. पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी या वेळी उपस्थित असतील. अजित पवार यांच्या उपस्थितीत १९ जूनला पक्षाच्या नव्या कार्यालयात निर्धार कार्यक्रम होणार आहे.”
-प्रशांत जगताप, शहराध्यक्ष
चौकट
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार आहेत. सत्ता समाजविकासाचे साधन हाच तो विचार. महिलांंना राजकारणात आरक्षण हा क्रांतिकारक विचार प्रत्यक्षात आणणाऱ्या पक्षाचे काम करण्यात आनंद आहे.”
-वंदना चव्हाण, खासदार, राज्यसभा