तळेगाव ढमढेरे येथे ‘नो पार्किंग झोन’चा निर्णय, वाहतूककोंडी सुटल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:25+5:302021-03-06T04:10:25+5:30
नुकतीच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतसमोर वाहतूककोंडी नित्याचीच, ग्रामस्थ त्रस्त, प्रशासनाने लक्ष द्यावे : नागरिकांची मागणी, या आशयाची बातमी लोकमतमध्ये (दि. ...
नुकतीच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतसमोर वाहतूककोंडी नित्याचीच, ग्रामस्थ त्रस्त, प्रशासनाने लक्ष द्यावे : नागरिकांची मागणी, या आशयाची बातमी लोकमतमध्ये (दि. ३) प्रसिद्ध झाली होती. याची तत्परतेने दखल घेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी समन्वय बैठक घेऊन तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालय यांच्या समोरून जाणारा शिक्रापूर-न्हावरा रस्ता रहदारीचा असल्याने या परिसरात नागरिकांना सातत्याने वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत होते. वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडवण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ‘नो पार्किंग झोन’चा निर्णय जाहीर केला असून, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या वेळी मार्गदर्शन करताना पोलिस उपनिरीक्षक शिवदास खाडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसर हा ‘नो पार्किंग झोन’ घोषित केला असून, या परिसरात वाहने पार्किंग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या समन्वय बैठकीनंतर महत्त्वपूर्ण ‘नो पार्किंग झोन’चा निर्णय झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी पोलीस उपनिरीक्षक शिवदास खाडे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल अॅड. सुरेश भुजबळ, राहुल भुजबळ, कोमल शिंदे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, सामाजिक कार्यकर्ते संदीप ढमढेरे, सुदर्शन तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या पाठीमागे माजी उपसरपंच विजय ढमढेरे यांची खाजगी मालकीची असणारी जागा तात्पुरती वाहन पार्किंगसाठी देण्याचे या वेळी ठरले आहे.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांत १६५ वाहनांवर केसेस केल्या. असून ३३ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.यापुढेही बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याने नो पार्किंग झोनमध्ये कोणीही वाहने लावू नयेत. वाहने ठरवून दिलेल्या जागेच्या पार्किंगमध्येच लावावीत.
-शिवदास खाडे, पोलीस उपनिरीक्षक, शिक्रापूर पोलीस स्टेशन.
तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतमध्ये वाहतूककोंडी संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत सदस्य अनिल भुजबळ.
तळेगाव ढमढेरे येथे रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’संदर्भात पट्टे रंगवताना ग्रामपंचायतीचे कर्मचारी.