Shivsena | ‘धनुष्यबाण शिंदे गटाकडे’च्या निर्णयाने कुठे संताप, तर कुठे उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:01 PM2023-02-18T13:01:44+5:302023-02-18T13:02:23+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय...
पुणे :शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे ठेवण्याच्या निवडणूक आयाेगाच्या निर्णयावर राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांनी आयाेगाचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले; तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी संताप व्यक्त केला.
कसोटी जाहीर करावी
पक्षफुटीचे प्रकार याआधीही झाले आहेत, त्यावेळी आयोगाने वाद असलेले निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. तो दाखला असतानाही यावेळी चिन्ह बहाल करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय कायदा किंवा न्यायाच्या कसोटीवर झाला आहे, असे म्हणता येत नाही. आयोगाने कोणत्या कसोटीवर निर्णय घेतला हे त्यांनी जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे.
- मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस
पक्षपाती निर्णय :
अर्जुनाला पाण्यात पाहून लक्ष्य भेदताना माशाचा फक्त डोळा दिसत होता. तसा निवडणूक आयोगाला पाण्यात पाहताना धनुष्यबाणाऐवजी फक्त कमळच दिसत असावे. त्याला अनुषंगूनच हा निर्णय आहे, असे म्हणावे लागेल. कोणते नियम, कोणते संकेत, कोणता कायदा या निर्णयाला लावण्यात आला हे अनाकलनीय आहे.
- अनंत गाडगीळ, माजी आमदार, प्रवक्ता, काँग्रेस.
कसब्याच्या निवडणुकीत चीड दिसून येईल :
भाजपने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून हा निर्णय घ्यायला भाग पाडला आहे. न्यायालय आणि जनतेवर आमचा विश्वास आहे. कसबा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसैनिक आणि जनता मतदानातून व्यक्त करेल या निकालाची चीड, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत
देशाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत भाजप इतका चुकीच्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर अन्य कोणी केला नाही. या निर्णयाने शिवसैनिक रडला आहे. कसबा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात या निर्णयाचे पडसाद उमटलेले दिसतील. शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करतील, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटचाल करीत आहे. खऱ्या अर्थाने हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे, असे बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी सांगितले.