राज्यातील ३०७४ प्राध्यापक भरतीचा निर्णय आठवडाभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:29+5:302021-06-28T04:08:29+5:30
प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत राज्यातील विविध संघटनांकडून मागणी केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापक संघटनांचे पुण्यात उच्च शिक्षण ...
प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत राज्यातील विविध संघटनांकडून मागणी केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापक संघटनांचे पुण्यात उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर सामंत यांनी रविवारी चर्चा केली. सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सामंत म्हणाले की, प्राध्यापक व ग्रंथपालांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून, प्राध्यापक भरतीची फाईल अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांची या फाईलवर आठवड्याभरात स्वाक्षरी होईल. त्यानंतर शिक्षण विभागाकडून प्राध्यापक भरतीचा अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील तासिका तत्त्वावरील धोरण बंद करण्याची मागणी प्राध्यापक संघटनांकडून केली जात आहे. याबाबतचा अभ्यास करण्यासाठी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे,असे नमूद करुन सामंत म्हणाले की, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात २५ टक्के वाढ प्रस्तावित आहे. तसेच यूजीसीच्या नियमावलीप्रमाणे ४८ मिनिटांचा एक तास गृहीत धरला जाणार आहे. या वाढीमुळे राज्य शासनावर सुमारे ५१ कोटी ५१ लाख ६० हजार एवढा आर्थिक भार पडणार आहे.
-----------
मानधन वाढविण्याचा प्रस्ताव
कला वाणिज्य व विज्ञान विद्या शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या थेअरी लेक्चरसाठी ६५० रुपये, तर पदव्युत्तर पदवीसाठी ७५० रुपये, तसेच शिक्षणशास्त्र व विधी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रति तास ७५० रुपये एवढे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
------------
गैरव्यवहार असल्यास गुन्हा दाखल करू
प्राध्यापक भरतीमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराबद्दल विचारले असता सामंत म्हणाले की, प्राध्यापक भरतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. पूर्वी माझ्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर एका अधिकाऱ्याची मी बदली केली.
--------------