सदनिका विक्रीचा निर्णय हा बिल्डर धार्जिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:48+5:302021-06-18T04:08:48+5:30
पुणे : महापालिकेच्या मालकीच्या सदनिका विक्री करण्याचा निर्णय हा सत्ताधारी पक्षाने केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी घेतला आहे़ प्रत्येक ...
पुणे : महापालिकेच्या मालकीच्या सदनिका विक्री करण्याचा निर्णय हा सत्ताधारी पक्षाने केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी घेतला आहे़ प्रत्येक सदनिकेमागे एक रक्कम निश्चित करून या सदनिका विक्रीचा घाट घातला गेला असून, सत्ताधारी भाजपचा हा गेल्या साडेचार वर्षांतील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. या प्रस्तावावर फेरप्रस्ताव दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
जगताप गुरुवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत बोलत होते. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यावेळी उपस्थित होत्या. महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने, सदनिका विक्रीतून व अॅमेनिटी स्पेस भाड्याने देऊन २०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल व त्यातून शहराचा विकास करता येईल, असा बनाव सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पुणे महापालिका राज्यातील ‘अ’ दर्जाची असून, महापालिकेकडे २ हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी बँकेत आहेत. विकासासाठी या ठेवींवर कर्जरोखे घ्यावेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा देऊ. मात्र, महापालिकेला गेल्या कित्येक वर्षांत मिळालेल्या सदनिका केवळ दोन महिन्यांत विक्री करण्याचा प्रस्ताव ऐनवेळी दाखल करून सत्ताधारी पक्षाने तो मान्य करून घेतला. ही पुणेकरांची फसवणूक असल्याचे जगताप म्हणाले.