पुुरंदर विमानतळावर लवकरच निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:55 PM2018-04-04T12:55:20+5:302018-04-04T12:55:20+5:30
केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित पुरंदर येथील विमानतळाबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली.
पुणे : केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिल्लीत पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुढीत दोन ते तीन दिवसांत सिन्हा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर राज्य शासनाबरोबर लवकरच बैठक घेऊन विमानतळाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित पुरंदर येथील विमानतळाबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदी या बैठकीत उपस्थित होते.
त्यात विमानतळाच्या प्रस्तावित जागेसाठी सध्या अस्तित्वात असणारे जोडरस्ते, प्रस्तावित रिंगरोड तसेच रेल्वे आणि मेट्रो यांची विमानतळास जोडणी आदी विषयांवर चर्चा झाल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
...................................
पुण्याच्या विकासकामांना गती मिळावी, या उद्देशाने विविध कामांच्या पाठपुरावा केला जातो. पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा घ्यावा, अशी विनंती केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना केली होती. त्यावर सिन्हा यांनी मंगळवारी विमानतळाबाबत आढावा बैठक घेतली. त्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर राज्य शासनाबरोबर एक बैठक होईल. त्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात येईल. अनिल शिरोळे, खासदार
..........................
भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचा त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. विमानतळाला काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या जमिनी जाणार म्हणून ते संभ्रमात आहेत. त्यामुळे अलीकडेच त्यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढला गेला पाहिजे. त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष त्या शेतकºयांना भेटून चर्चा व्हायला हव्यात. सुप्रिया सुळे, खासदार