राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या 5 ते 6 दिवसांत घेणार: राजेश टोपे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:10 AM2021-08-20T00:10:28+5:302021-08-20T00:15:08+5:30
शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल.
पुणे : राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सचा अहवाल आल्यावर घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टास्क फोर्सचा हा अहवाल येत्या 5 ते 6 दिवसांत येणे अपेक्षित आहे. त्यानंतर टास्क फोर्सचा अहवाल आल्यानंतर शालेय व उच्च शिक्षण विभाग एकत्रित राज्यातील शाळा, कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आहे असेेेही ते म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे गुरुवारी (दि. 19) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टोपे म्हणाले, राज्यात आणि देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना मंदिर उघडण्याबाबत घाई करणे योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री मंदिर सुरु करण्यासंदर्भात योग्यवेळी निर्णय घेतील.
पुढे ते म्हणाले, शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. कुलगुरु त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील. साधारणपणे येत्या पाच ते सहा दिवसात निर्णय होईल.
शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची चर्चा होऊन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.