बदनामीला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय
By admin | Published: June 19, 2016 04:43 AM2016-06-19T04:43:00+5:302016-06-19T04:43:00+5:30
सरकार बदनामीच्या घेऱ्यात सापडले आहे. त्यातून बाहेर निघायचे असेल तर आरोप करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पक्षातील तसेच पक्षाबाहेरच्या
पुणे : सरकार बदनामीच्या घेऱ्यात सापडले आहे. त्यातून बाहेर निघायचे असेल तर आरोप करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पक्षातील तसेच पक्षाबाहेरच्या काही हितचिंतकांच्या माध्यमातून विरोधकांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत चर्चा झाली असल्याचे समजते. त्याचप्रमाणे शिवसेनेबरोबर निदान काही काळ तरी सांभाळून घेण्याचाही निर्णय झाला असल्याची माहिती मिळाली.
पक्षाच्या दोनदिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या उद््घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली. नुकताच झालेला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा व त्यानंतर लगेचच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर सुरू झालेले आरोप, त्यापूर्वी विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्या कामकाजावरून निर्माण झालेले वादंग हे सगळे ठरवून चाललेले असल्याचा मुद्दा एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने बैठकीत उपस्थित केला. विरोधकांना त्यातही काँग्रेसला भाजपाची बदनामी करायची आहे, त्यांच्याकडूनच जास्त आरोप असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेतील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी द्यायची, त्यांना पक्षाबाहेरच्या हितचिंतकांची मदत मिळवून द्यायची व त्यांच्या माध्यमातून विरोधकांची काही प्रकरणे उकरून काढायची असे ठरवण्यात आले, अशी माहिती बैठकीला उपस्थित काही विश्वसनीय सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपांच्या घेऱ्यात अडकविले आहेच, त्याचप्रमाणे काँग्रेसचीही काही प्रकरणे बाहेर काढून त्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडूनही पक्षाच्या नेत्यांवर कधी स्पष्टपणे तर कधी आडून आरोप होत असून त्याचाही पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र एकाच वेळी सगळ्यांना अंगावर घेणे योग्य नाही. त्यामुळे शिवसेनेबरोबर सांभाळून घेण्याचा सल्ला ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली. त्याचेच प्रत्यंतर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी उद््घाटनावेळी केलेल्या भाषणात उमटले. त्यांनी जाहीरपणे पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना शिवसेनेबरोबर चर्चा करून मतभेद मिटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांनीही शिवसेनेबरोबर आमचे अनेक वर्षांपासूनचे राजकीय संबंध आहेत. त्यामुळे त्यांची टीका जास्त झाली, की आम्ही त्यांना उत्तर देतो, इतर वेळी नाही, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमत्र्यांनी खोडले मंत्र्यांवरचे आरोप
पुणे: विविध आरोपांनी घेरलेल्या राज्य सरकारमधील काही मंत्र्यांना शनिवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच क्लिन चिट दिली. ज्यांना सरकारी मालकीचे भूखंड लाटले त्यांनी आमच्या मंत्र्यांवर आरोप करू नये, आमचा एकही मंत्री भ्रष्टाचारी नाही असे ते म्हणाले. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद््घाटन कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी खडसे यांच्यासह त्यापुर्वी आरोप झालेल्या विनोद तावडे, पंकजा मुंडे, व अलीकडेच आरोप झालेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कसलाही भ्रष्टाचार झालेला नाही असे सांगितले. जमीन घोटाळ्यावरून नुकताच राजीनामा द्यावे लागलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे हेही यावेळी व्यासपीठावर बसले होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर झालेल्या जमीन खरेदीच्या आरोपातही तथ्य नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.