पुण्यातील उद्यानात Couples ला प्रवेश बंदीचा निर्णय मागे; अश्लील वर्तन रोखण्यासाठी सीसीटीव्ही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:57 PM2022-08-29T18:57:27+5:302022-08-29T18:58:03+5:30
पक्षीनिरिक्षण केंद्राच्या प्रवेशव्दारावर महापालिका उद्यान विभागाच्या वतीने कपल्स नॉट अलाऊडचा फलक लावण्यात आला होता
पुणे : पाषाण तालवाजवळील पक्षी निरिक्षण केंद्रामध्ये प्रेमीयुगलांना आम्ही आता प्रवेश देत आहोत. मात्र त्यांच्याकडून या परिसरात अश्लिल वर्तन होऊ नये यासाठी आमचे त्यांच्यावर सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकांकडून लक्ष असणार आहे. अशा सुचना करत अखेर महापालिकेने पाषाण तलाव पक्षीनिरिक्षण केंद्रामध्ये अविवाहीत जोडप्यांचा प्रवेश बंदीचा निर्णय माघार घेतला आहे.
पक्षीनिरिक्षण केंद्राच्या प्रवेशव्दारावर महापालिका उद्यान विभागाच्या वतीने कपल्स नॉट अलाऊडचा फलक लावण्यात आला होता. त्याविरोध अनेकांनी नागिरकांनी आक्षेप घेतला होता. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने तो फलक हटविला आणि अविवाहित जोडप्यांना प्रवेशबंदीचा निर्णयही माघार घेतला.
याबाबत महापालिका उद्यान प्रमुख अशोक घोरपडे म्हणाले की, येते अविवाहित जोडप्यांना बंदी नव्हतीच मात्र शाळा-महाविद्यालयातील तरुण-तरुणी येथील झाडी-झुडपात बसून अश्लिल चाळे करत असल्याच्या तक्रारी पक्षीनिरिक्षकांनी केली होती. सार्वजनिक ठिकाणी अशा पध्दतीच्या वर्तनामुळे येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही होती त्यामुळे येथील जेष्ठ नागरिक आणि पक्षी निरक्षकांनीच अशा जोडप्यांना प्रतिबंध करण्यासाठी फलक लावला होता. या फलकाला पाच वर्षे झाली. मात्र महापालिकेकडून जोडप्यांना प्रवेश बंदीबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. मात्र कोणी अश्लिल वर्तन करत असेल तर त्यांना हटकले जात होते. प्रत्यक्षात कोणत्या जोडप्याला प्रवेशच नाकारला गेला नाही. काही व्यक्तींनी फलकावर आक्षेप घेतल्यामुळे महापालिकेने तो फलकही हटविला आहे. फलक हटविला याचा अर्थ येथे तरुण-तरुणींसाठी रोमान्सचे हक्काचे स्थान मिळाले असा गैरसमज त्यांनी करून घेऊ नये . तेथे सुरक्षारक्षकाचा पहारा अधिक कडक करण्यात आला असून त्या सीसीटीव्हीची निगरानी असणार आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरांची संख्या वाढविण्याबाबतही वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे याठिकाणी जोडप्यांसह कुणीही जरुर यावे मात्र एकांत मिळाला म्हणून गैरकृत्य केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार याचेही भान असावे.