इंडियन हिस्ट्री काँग्रेसबाबत विद्यापीठाचा निर्णय ‘राजकीय’च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:51 AM2018-12-17T00:51:31+5:302018-12-17T00:51:55+5:30
मिळालेला मान गेला : शैक्षणिक कारणासाठी दीड-दोन कोटींचा खर्च सहजशक्य
पुणे : इंडियन हिस्ट्री काँग्रेसची परिषद आर्थिक कारणास्तव पुढे ढकलण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयावर एका माजी कुलगुरूंनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठासाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च फार मोठा नाही. ही परिषद विद्यापीठात होणे प्रतिष्ठेचे आहे. पण, विद्यापीठाची भूमिका दुर्दैवी असून यामध्ये राजकारण असल्याचे दिसते, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यापीठामध्ये दि. २८ ते ३० डिसेंबर यादरम्यान ही परिषद होणार होती. मात्र, विद्यापीठाने आर्थिक कारणास्तव ही परिषद ठरलेल्या कालावधीत घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय इंडियन हिस्ट्री काँग्रेसला कळविला आहे. यावर संस्थेकडून नाराजी व्यक्त करून विद्यापीठाला नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे पैसे परत करण्याच्या सूचना केल्या. तसेच ही परिषद कुठे व कधी होणार याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असेही संस्थेकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यापीठात ही परिषद होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाव न छापण्याच्या अटीवर ते म्हणाले, विद्यापीठाने परस्पर घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. ही परिषद ५० वर्षांपूर्वी पुण्यात झाली होती. एवढ्या वर्षांनी पुन्हा पुण्यात घेण्याचा मान विद्यापीठाला मिळत आहे. ही प्रतिष्ठेची गोष्ट आहे.
विद्यापीठासाठी दीड ते दोन कोटी रुपये मोठी रक्कम नाही. मुळात अशा परिषदांसाठी विद्यापीठाला एवढे पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. यापूर्वीही विद्यापीठात अनेक परिषदा झालेल्या आहेत. सहभागी सदस्यांची नोंदणी, प्रायोजक, विविध स्टॉल्स, प्रदर्शन या माध्यमातून निधी जमा होतो. त्यातूनच खर्च भागतो. काही वेळा पैसे शिल्लक राहतात. विद्यापीठावर फारसा बोजा पडत नाही. पण जरी पैशांची गरज भासली तरी विद्यापीठ शैक्षणिक कारणास्तव हा भार उचलू शकते. विद्यापीठासाठी हा निधी फार मोठा नाही. मात्र, पैसे नसल्याचे सांगणे दुर्दैवी आहे. यामध्ये राजकारण असल्याचे स्पष्टपणे दिसते, अशी टीकाही त्यांनी केली.
भारत इतिहास
संशोधक मंडळाने केला असता खर्च...
इंडियन हिस्ट्री कॉग्रेसची स्थापना भारत इतिहास संशोधक मंडळाने केली. मात्र त्याचा विसर इंडियन हिस्ट्री कॉग्रेसला पडला. पुण्यात त्यांनी मोठे अधिवेशन घेण्याचा विचार केला. विद्यापीठाने त्यांना आर्थिक मदत करण्यास सक्षम नसल्याचे कारण दिले. प्रत्यक्षात इंडियन हिस्ट्री कॉग्रेसने भारत इतिहास संशोधन मंडाळाला विचारात घेणे गरजेचे होते. त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. जेएनयू विद्यापीठात मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेचा बेजबाबदारपणा यानिमित्ताने समोर आला आहे. मुळातच या संस्थेने आपल्या मूळ संस्थेशी नाळ तोडली आहे. सुरुवातीपासून त्यांनी संवादाची भूमिका ठेवणे गरजेचे होते. तसे झाले असते तर या परिषदेचे आयोजन भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने करण्यात आले असते. मग त्याकरिता कितीही खर्च आला असता तो करण्यास संस्था खंबीर आहे.
- पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक व चिटणीस भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे
परिषद रद्द करणे योग्य नाही
वेगवेगळ्या परिषदांच्या माध्यमातून नवनवीन विचार पुढे येत असतात. त्या विचारांचे स्वागत करणे महत्त्वाचे आहे. एखादा नवीन विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारा असेल तर त्याविषयी स्वागताची भावना हवी. इंडियन हिस्ट्री कॉग्रेससारख्या मान्यताप्राप्त संस्थेच्या परिषदेला जर विरोध होत असेल तर ते चुकीचे आहे. नवनवीन संशोधनांची मांडणी यानिमित्ताने होणार असेल तर त्याला विरोध का? विद्यापीठाने त्याला विरोध करण्याकरिता आर्थिक कारण पुढे केले आहे. ते योग्य वाटत नाही.
- डॉ. गणेश देवी, समन्वयक, पेन इंटरनॅशनल कॉग्रेस
इंडियन हिस्ट्री कॉग्रेसच्या परिषदेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नकार देणे दुर्दैव म्हणावे लागेल. परिषदेकरिता जो काही खर्च होणार आहे तो विद्यापीठाला जड नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही परिषद केवळ पुण्यापुरतीच मर्यादित नसून त्याकरिता विविध राज्यांतील इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. याविषयी कुठलीही राजकीय टिप्पणी करायची नाही. मात्र यामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. पुणे विद्यापीठ महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली जाते. आता परिषद टाळण्याकरिता पैशाचा जो मुद्दा पुढे येत आहे तो चुकीचा आहे.
- डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास अभ्यासक व संशोधक