अखेर निर्णय झाला! यंदाच्या आषाढी वारीत विठ्ठलाचे स्मरण बसमधूनच; वाखरी ते पंढरपूर दरम्यानचा प्रवास पायीवारीने होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:27 PM2021-06-14T18:27:23+5:302021-06-14T18:27:29+5:30
यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी, देवस्थान आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती
आळंदी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी वारीसाठी परवानगी दिलेल्या पालख्या या बसनेच नेण्यात येणार आहेत. राज्य शासनाने याबाबत आदेश नुकताच जारी केला आहे. या आदेशानुसार गतवर्षीप्रमाणेच वारीचं स्वरुप असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात वाखरी ते पंढरपूर दरम्यानचे दीड किलोमीटर अंतरच पायीवारी होणार आहे.
यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी, देवस्थान आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारनं यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. शासनानं वारीसाठी काढलेल्या सुधारित नियमावलीनुसार मानाच्या दहा पालख्यांनाच या वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी यावर्षी देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळयांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.
या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पालखी किंवा दिंड्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याव्दारे आषाढीवारीमध्ये सहभागी होण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी प्रातिनिधीक स्वरूपात पायीवारी करता येणार आहे. यावर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वारीसाठी विशेष २० बस...
मानाच्या दहा पालख्यांना वारीला जाण्यासाठी २० बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. सर्व पालख्यांना कोरोना नियम पालन करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.