सदनिकांना करमाफी अशक्य, स्थायी समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:23 AM2018-06-13T03:23:05+5:302018-06-13T03:23:05+5:30
पुणे शहरात सध्या ५०० चौरस फुटांच्या सदनिकांना मिळकत कर माफ करण्यात आला आहे. त्यात शासनाने आयात कर, स्थानिक संस्था कर अशी अनेक उत्पन्नाची साधने बंद केली आहेत.
पुणे - शहरात सध्या ५०० चौरस फुटांच्या सदनिकांना मिळकत कर माफ करण्यात आला आहे. त्यात शासनाने आयात कर, स्थानिक संस्था कर अशी अनेक उत्पन्नाची साधने बंद केली आहेत. महापालिकेची उत्पन्नाची साधने दिवसेंदिवस कमी होत असताना शहरातील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकत कर माफ करणे आर्थिकदृष्ट्या सयुक्तिक ठरणार नाही, असा अभिप्राय आयुक्त सौरभ राव यांनी दिला. या अभिप्रायानुसार मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मिळकत कर माफ करणे शक्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातदेखील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकत कर माफ करण्याचा ठराव विशाल धनकवडे आणि संगीता ठोसर यांनी दिला होता. स्थायी समितीच्या वतीने हा ठराव अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठविला होता. या ठरावावर अभिप्राय देताना आयुक्तांनी महापालिकेची आयात कर, स्थानिक संस्था कर अशी सर्वांत महत्त्वाची उत्पन्नाची साधने बंद केली आहेत.
सध्या महापालिका शासनाकडून प्राप्त होणाऱ्या जीएसटीच्या अनुदानावर अवलंबून असून, त्याशिवाय मिळकत कर हे ऐकमेव उत्पन्नाचे महत्त्वाचे सांधन आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील ७०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मिळकत कर माफ करणे महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सयुक्तिक ठरणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय दिला आहे.