हवेली तहसील कार्यालय परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:16+5:302021-03-24T04:10:16+5:30
हवेली तालुक्यातील सर्व भागातील खातेदार शेतकरी, नागरिक, विद्यार्थी व पालक विविध कामांसाठी तहसील कार्यालयात ये - जा करत असतात. ...
हवेली तालुक्यातील सर्व भागातील खातेदार शेतकरी, नागरिक, विद्यार्थी व पालक विविध कामांसाठी तहसील कार्यालयात ये - जा करत असतात. या तहसील कार्यालयाच्या शेजारी पुणे शहर तहसील कार्यालय, नगर भूमापन अधिकारी कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय असल्याने याठिकाणी नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. पुणे शहर व उपनगरांतील अनेक नागरिक याठिकाणी कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणात येत असतात. हवेली तहसील कार्यालयातील कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून, तो प्रशासन व नागरिकांची चिंता वाढवणारा आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कार्यालयातील इतर कर्मचा-यांनी खबरदारी घेतली आहे.
हवेली तहसील कार्यालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अभिलेख कक्ष ( रेकॉर्ड रुम ) बंद ठेवला असून येथे विनाकारण फिरणा-यांना अटकाव केला आहे. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे याठिकाणी कर्मचारीही येण्यास तयार नाहीत. मात्र, वरिष्ठांच्या कार्यालयीन आदेशामुळे येथील कार्यविवरण मात्र कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत धिम्या गतीने सुरू ठेवले आहे.
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्याने कार्यालय पूर्णपणे सॅनिटाईझ केले आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी कररू नये. फक्त महत्त्वाच्या कामांसाठीच तहसील कार्यालयात यावे. कोविड संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण अथवा औषधोपचार घ्यावेत.
अजय गेंगाणे ( निवासी नायब तहसीलदार, हवेली )