वाढत्या उन्हामुळे शेअरल सायकलचा प्रतिसाद मावळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 03:17 PM2018-04-22T15:17:35+5:302018-04-22T15:17:35+5:30
वाढत्या तापमानामुळे पुणे स्मार्ट डेव्हल्पमेंट काॅर्पाेरेशनच्या वतीने सुरु करण्यात अालेल्या स्मार्ट सायकल शेअरिंग या याेजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर एफसी, जेएम राेडवरील सायकलींची संख्या कमी झाली अाहे.
पुणे : दिवसेंदिवस तापमानात माेठी वाढ हाेतीये. लाेक दुपारच्यावेळी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र अाहे. कडक उन्हामुळे घामाच्या धारा निघत अाहेत. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात अालेल्या सायकल शेअरिंग याेजनेला प्रतिसाद कमी हाेत असल्याचे चित्र अाहे. गेल्या काही दिवसांपासून या सायकल वापरण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाले अाहे. त्याचबराेबर विविध सायकल स्टेशन्सवर असलेल्या सायकलींचे प्रमाणही खूपच कमी झाले अाहे.
पुणे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशनच्या वतीने तसेच पेडल या कंपनीच्या सहकार्याने स्मार्ट सायकल शेअरिंग याेजना शहरात सुरु करण्यात अाली. यात अर्ध्या तासाला एक रुपया या दराने सायकल भाड्याने घेता येते. सुरुवातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अाणि आैंध भागात ही याेजना प्रायाेगिक तत्त्वावर सुरु करण्यात अाली. या दाेन्ही ठिकाणी या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहराच्या इतर भागातही हि याेजना सुरु करण्यात अाली. त्या अंतर्गत पुण्याती एफसी राेड व जेएम राेडवर काही सायकल स्टेशन्स तयार करण्यात अाले. अश्याच प्रकारचे स्टेशन्स पुढे विधी महाविद्यालय रस्त्यावरही सुरु करण्यात अाले. सुरुवातीच्या काळात कुतुहलापाेटी अनेकांनी या सायकल्स चालविण्यास सुरुवात केली. या रस्त्यांवर तरुण-तरुणी या सायकल्स घेऊन फेरफटका मारत असल्याचे चित्र दिसत हाेते. मात्र जसजसा उन्हाचा पारा वाढत गेला. तसतसा या याेजनेला मिळणारा प्रतिसादही कमी हाेत गेला. प्रचंड उन्हामुळे घामाच्या धारा निघत असल्याने त्यात पुन्हा सायकल चालवाणे नागरिकांना कठीण जात अाहे. त्यामुळे सध्यातरी या याेजनेला ब्रेक लागल्याचे चित्र अाहे. तसेच सुरुवातील माेठ्याप्रमाणावर सायकल्स या सायकल्स स्टॅंण्डवर दिसत हाेत्या. सध्या मात्र हे प्रमाण कमालीचे कमी झाले अाहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही सारखीच परिस्थीती असून विद्यापीठातले विद्यार्थ्यांनी सुद्धा सायकलचा वापर कमी केला अाहे. पेडल कंपनीनंतर युफाे या कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या सायकल विद्यापीठात दाखल करण्यात अाल्या हाेत्या. या सायकल माेफत उपलब्ध करुन दिल्या हाेत्या. त्यामुळे याला विद्यापीठात माेठा प्रतिसाद मिळाला हाेता. सध्या मात्र विद्यापीठातून या सायकल गायब झाल्याचे चित्र अाहे. याबाबत बाेलताना विद्यापीठातील विद्यार्थी राहुल ससाणे म्हणाला, सुरुवातील विद्यार्थ्यांनी या सायकल शेअरिंग याेजनेला खूप चांगला प्रतिसाद दिला. सध्या मात्र वाढत्या उन्हामुळे सायकल वापरण्याचे प्रमाण कमी झाले अाहे. त्याचबराेबर विद्यापीठातील पिवळ्या रंगाच्या सायकल या बाहेरील काही लाेकांनी चाेरुन नेल्याचे चित्र अाहे. तर हिरव्या सायकलींची संख्याही कमी झाली अाहे.