दुबईत माती विकण्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून इंदापुरात फसवले, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:50 PM2018-02-09T18:50:32+5:302018-02-09T18:53:38+5:30
भागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर : भागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शिवीगाळ व दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महंमद कमल अन्सारी (रा. बॉम्बे फर्निसिंग बिल्डिंग, कोणार्णनगर, विमाननगर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संभाजी अर्जुन पठारे (वय ५०, रा.गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठारे यांचा मुलगा पुण्यातील वाघोली येथील पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्याची महंमद अन्सारीसोबत ओळख झाली. आरोपीने त्याला वेळोवेळी फोन करुन तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन भागीदारीमध्ये शेतकऱ्यांची एक एकर जमीन घ्यायची आहे का अशी विचारणा केली. या जमिनीतील माती दुबईला विकायची असे सांगून त्याने पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याकरिता आईवडिलांकडून दहा लाख रुपये आणायला सांगितले.
पठारे यांच्या मुलाने पुण्यातील लष्कर भागातील लकी हॉटेलमध्ये पठारेंशी अन्सारीची भेट घालून दिली. आरोपीने त्यांना दुबईमध्ये माती विक ण्याच्या व्यवसायाची माहिती देऊन पैशांची मागणी केली. पठारे यांनी त्याला दोन हप्त्यांमध्ये पैसे देण्याचे मान्य केले. ३ मे २०१७ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर शाखेमध्ये जाऊन पठारे यांनी पत्नीच्या खात्यावरुन अन्सारीच्या विमाननगर शाखेच्या खात्यावर आरटीजीएसने २ लाख ३२ हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर १० हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर अन्सारीने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. व्यवसाय देखील चालु केला नाही. भेट घेणे टाळले. फियार्दीने मोबाईलवरुन वेळोवेळी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी आरोपीने शिवीगाळ व दमबाजी करून फियार्दीस जीवे मारण्याची धमकी दिली. आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.