महापालिकेच्या हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:52 PM2019-03-27T13:52:16+5:302019-03-27T13:55:45+5:30

एड्स आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, चालक अशा नागरिकांचे आहे.

Decrease of number AIDS patients in the municipal limits | महापालिकेच्या हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट 

महापालिकेच्या हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट 

googlenewsNext
ठळक मुद्दे जनजागृतीवर भर : औषधे आणि समुपदेशनाचा होतोय उपयोगगेल्या तीन वर्षात ४ हजार ९६५ जणांना या आजाराची बाधा, २२१८ स्त्रियांचा समावेशतपासणी केल्यानंतर जर रोगनिदान झालेच तर तातडीने उपचार सुरु

पुणे : जनजागृती, समुपदेशन आणि औषधांच्या नियमित सेवनामुळे महापालिका हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांची संख्या घटली आहे. २०१६ च्या तुलनेत २०१८ ची आकडेवारी घटली असली तरी २०१७ च्या तुलनेत वाढल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षात ४ हजार ९६५ जणांना या आजाराची बाधा झाली असून यामध्ये २२१८ स्त्रियांचा समावेश आहे. यातील २०९ स्त्रिया गर्भवती असल्याचेही समोर आले आहे. 
हा आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण अल्प उत्पन्न गटातील तसेच कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, चालक अशा गटातील नागरिकांचे आहे. पालिकेकडून शासनाच्या सुचनांनुसार  हाय रिस्क गटातील लोकांची वारंवार एचआयव्ही तपासणी, रक्त तपासणी केली जाते. यासोबतच त्यांचे समुपदेशनही करण्यात येते. पालिकेकडून दर सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने एड्सविषयक जनजागृतीकरिता समुपदेशकांची नियुक्ती केली जाते. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, या स्त्रियाच अधिक जागरुक असल्याचे आणि असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापासून परावृत्त झाल्याचे पालिकेच्या पाहणीमधून समोर आले आहे. 
तपासणी केल्यानंतर जर रोगनिदान झालेच तर तातडीने उपचार सुरु केले जातात. रुग्णांची नियमित तपासणी केली जाते. उपचारांमध्ये सातत्य राहील याची काळजी घेतली जात असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. उपचारांमध्ये सातत्य राहिल्याने सीडीफोर पेशी वाढतात. आजाराची लक्षणे कमी होत जातात. याचा परिणाम आयुर्मयार्दा वाढण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये १० वर्षांहून अधिक काळ  सातत्यानं उपचार घेऊन सर्वसामान्य जीवन जगणारेही रुग्ण आहेत. 
====
शासनानं १९८७ मध्ये  ह्यएड्स कंट्रोलह्ण हा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीसह आजाराची लागण कशी होते, रक्त तपासणी, उपचार याविषयी जनजागृती सुरु करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, रेल्वे आणि बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणांवर पोस्टर्स, बॅनर्स लावणे, जाहिराती, रेडीओ, टेलीव्हीजन, इंटरनेट आणि अलिकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर जनजागृतीसाठी केला जात आहे. 
====
महापालिकेकडून आजाराचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी हाय रिस्क गटातील व्यक्तींची तपासणी, बाधित व्यक्तींवर नियमित तसेच विनाशुल्क उपचार, त्यांच्या संपकार्तील व्यक्तींची तपासणी, समुपदेश अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत. गर्भवती स्त्रिया, अतिदक्षता विभागातील रुग्ण, रक्तपेढीमध्ये गोळा होणारे रक्त, शस्त्रक्रियेसाठी आलेले रुग्ण, डॉक्टर्स आणि सहकारी अशा घटकांचीही तपासणी करण्यात येते. 
====
कशामुळे होऊ शकतो एड्स
असुरक्षित लैंगिक संबंध
दूषित रक्त संक्रमण
मातेकडून गर्भ किंवा स्तनपान करणाºया बाळाला
शिरेतून नशा आणणाºया औषधांचा वापर 
====
यापूर्वीची एड्सवरील औषधे अत्यंत महाग होती. त्यामुळे ती सर्वसामान्य रुग्णांना परवडत नव्हती. त्यानंतर स्वस्तातली आणि जेनेरीक औषधेही बाजार आली. पालिका आणि राज्य शासनाच्या केंद्रांमध्ये तसेच ससून रुग्णालयात ही औषधे मोफत दिली जातात. विविध स्वरुपाच्या औषधांच्या संचाला एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) असं म्हणतात. या औषधांच्या नियमित सेवनाने आजार बळावत नाही. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढत जाते, त्यामुळे जंतूंचा प्रभाव कमी होतो. 

Web Title: Decrease of number AIDS patients in the municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.