पावसाअभावी अडसाली ऊस लागवडीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:27+5:302021-09-03T04:10:27+5:30

बारामती : मागील दोन महिन्यांपासून बारामती उपविभागामध्ये अपेक्षित पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. बारामती उपविभागामध्ये ऊस उत्पादक ...

Decrease in sugarcane cultivation due to lack of rainfall | पावसाअभावी अडसाली ऊस लागवडीत घट

पावसाअभावी अडसाली ऊस लागवडीत घट

Next

बारामती : मागील दोन महिन्यांपासून बारामती उपविभागामध्ये अपेक्षित पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. बारामती उपविभागामध्ये ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र अद्याप अपेक्षित पाऊस नसल्याने अडसाली ऊस लागवडीमध्ये घट आली आहे.

तालुक्यात १५ हजार हेक्टरवर आडसाली ऊस लागवड होणे अपेक्षित असताना ११ हजार हेक्टरवरच लागणी झाल्या आहेत. इंदापूर तालुक्यात मात्र ९ हजार ७३४ हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीसाठी निश्चित करण्यात आले असताना तेथे १३ हजार २३२ हेक्टरवर लागवड झाली आहे. दुष्काळी तालुका समजल्या जाणा-या पुरंदरमध्येही २ हजार १३२ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असताना तेथे २ हजार ८०२ हेक्टरवर आडसाली ऊस लागण झाली आहे. बारामती उपविभागात खरिपाचे एकूण ९९ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित केले असताना प्रत्यक्षात १ लाख ५४ हजार हेक्टरवर पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यातही बारामती व इंदापूर तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दौंड व पुरंदरला अपेक्षित पेरणी उद्दिष्ट गाठता आलेले नाही. बारामती उपविभागामध्ये खरिपात बाजरी, मका, भात, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मटकी, हुलगा, वाल, घेवडा, पावटा, चवळी ही इतर कडधान्य, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ अशी गळीतधान्ये तसेच ऊस, कांदा, टोमॅटो यासह इतर फळपिके, फूलपिके घेतली जातात. यंदा उपविभागात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. गेली दोन वर्षे सुरुवातीचे तीन महिने दमदार पाऊस झाला होता. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पुन्हा दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाच्या पिकावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. पावसाने दडी मारल्याचा फटका बारामती तालुक्यात आडसाली ऊस लागवडींना बसला आहे.

दौंडमध्ये मात्र सरासरीच्या ६४ टक्के क्षेत्रावरच लागण झाली आहे. दौंडमध्ये १५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर लागण होणे अपेक्षित असताना आॅगस्टअखेर १० हजार २८ हेक्टरवर लागण झाली आहे. लांबलेल्या पावसाचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. पिकांच्या पोषक वाढीसाठी दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला असला तरी पावसाने मात्र पुरती निराशा केली आहे.

--------------------------------

बारामती उपविभागामध्ये पावसाची स्थिती समाधानकारक नाही. मात्र काही भागामध्ये चांगला पाऊस झाला आहे. पुढील काळात दमदार पाऊस झाला तर खरीप हंगामातील उत्पादनात वाढ होवू शकेल. सध्या तरी पीक स्थिती बरी आहे.

- वैभव तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती

-------------------------------

तालुकानिहाय खरीप पीक पेरणी (हेक्टरमध्ये)

तालुका पेरणी क्षेत्र

बारामती -५०,५६५

इंदापूर-४७,०७५

दौंड-२१,४६७

पुरंदर-३५, ५५०

------------------------------

उपविभागातील पाऊसाची स्थिती (जुन ते आॅगस्ट)

तालुका -पाऊस (मिलीमिटरमध्ये)

बारामती - २४६.१

इंदापूर- २८६.३

दौंड- २३३.०

पुरंदर- २५५.१

Web Title: Decrease in sugarcane cultivation due to lack of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.