उन्हाळ्यातही टँकरच्या मागणीत घट
By admin | Published: April 15, 2015 12:45 AM2015-04-15T00:45:26+5:302015-04-15T00:45:26+5:30
उन्हाळ्याचा तडाखा वाढायला सुरुवात झाल्यावर टँकरच्या मागणीमध्येही त्या प्रमाणात वाढ होते. मात्र, या वर्षी दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत टँकरच्या मागणीमध्ये घट नोंदविण्यात आली आहे.
पुणे : उन्हाळ्याचा तडाखा वाढायला सुरुवात झाल्यावर टँकरच्या मागणीमध्येही त्या प्रमाणात वाढ होते. मात्र, या वर्षी दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत टँकरच्या मागणीमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता कमी असणे, बांधकाम क्षेत्रातील मंदी या कारणांमुळे ही घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेचे तसेच खासगी असे मिळून साधारणत: १५० पाण्याचे टँकर शहरामध्ये आहेत. शहर विशेषत: उपनगरांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू होते. बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास प्रतिबंध केला जातो. या पार्श्वभूमीवर टँकरच्या मागणीत मोठी वाढ होते. फेब्रुवारी ते मे या ४ महिन्यांच्या कालावधीमध्ये महिन्याला टँकरच्या सरासरी १४ हजार फेऱ्या होतात. यंदा मात्र टँकरच्या सरासरी ११ हजार फेऱ्या होत आहेत.
उन्हाची तीव्रता यंदा एप्रिल उजाडला तरी कमीच राहिली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर तितका वाढलेला नाही. बांधकाम व्यवसायाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यामध्ये बांधकामांचे प्रमाणही वाढलेले असते. परिणामी टँकरची मागणी वाढते. यंदा बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी मंदी दिसून येत आहे. परिणामी टँकरचा वापर घटला आहे.
वडगावशेरी, चंदननगर, हडपसर, येरवडा, कोथरूड, फातिमानगर, कोंढवा या उपनगरांतून उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची मागणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, यंदा या भागांतूनही टँकरची मागणी कमी होत आहे. महापालिकेने पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्याने टँकरच्या मागणीत घट झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.
४गेल्या वर्षी फेब्रुवारी २०१४ मध्ये टँकरच्या फेऱ्या १२ हजार ४८५, मार्चमध्ये १४ हजार ४४१ फेऱ्या झाल्या होत्या. परंतु, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ११ हजार ९२२ आणि मार्चमध्ये १३ हजार ४७८ फेऱ्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिन्यात ५००, तर मार्च महिन्यात ९६३ फेऱ्या कमी झाल्या आहेत.