कोजागरी असूनही पुण्यात दुधाची मागणी घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:37 PM2019-10-14T12:37:32+5:302019-10-14T12:39:17+5:30
पावसाचे सावट असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर संक्रांत..
पुणे : कोजागरी आणि दुधाचे अतूट नाते, परंतु यंदा कोजागरी असूनही दुधाची मागणी घटली. गेल्या काही दिवसांपासून शहरावर पावसाचे सावट कायम आहे. यामुळेच गणेश मंडळे, सोसायट्यांमधून होणारे सार्वजनिक कार्यक्रमांचे प्रमाण घटल्याने दुधाची मागणी घटली आहे. शनिवारी कोजागरीच्या पार्श्वभूमीवर ६५ ते ७० रुपये प्रतिलिटर दर मिळाला. पण रविवारी पावसाची शक्यता लक्षात घेऊन दुधाला अपेक्षित मागणी मिळाली नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दुधाला मागणी कमी असल्याचे गणेश पेठ दूध बाजार खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील लोहगाव, वाघोली, वाडेबोल्हाई, वेल्हा, मुळशी परिसरातील शेतकºयांनी शनिवारी दूध विक्रीसाठी पाठविले. कोजागरी पौर्णिमेसाठी दुधाला मोठी मागणी असते. त्यामुळे शहरातील डेअरी व्यावसायिकांनी रविवारी दुधाची खरेदी केली, असे हिंगमिरे यांनी सांगितले. घाऊक बाजारात अठरा लिटर दुधाच्या घागरीला १२०० रुपये असा दर मिळाला. किरकोळीत ६० रुपये या दराने दुधाची विक्री करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी गणेश दूधभट्टीत एक लिटर दुधाची विक्री ५० ते ५५ रुपये या दराने करण्यात आली होती. कोजागरी पौर्णिमेला अनेक जण दुधाचा नैवेद्य अर्पण करतात, तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे, सोसायट्यांमध्ये कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. त्यामुळे दुधाच्या मागणीत दुपटी-तिपटीने वाढ होते.
..........
कोजागरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ही पौर्णिमा पावसानंतरची पहिली पौर्णिमा असते आणि तिला आश्विन पौर्णिमा म्हणतात. पावसात आकाश स्वच्छ नसते, परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसांनंतर स्वच्छ आणि सुंदर दिसत असते. त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे, म्हणून हा सण साजरा करतात. या दिवशी रात्री जागरण करून मसाला दूध पिण्याची परंपरा आहे. पुणे शहरात रविवारी अनेक ठिकाणी मसाला दुधाची विक्री करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.
.......
मोठी आवक...
४कोजागरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील दूधबाजारात (दूधभट्टी) पुणे जिल्हा परिसरातून रविवारी दुधाची मोठी आवक झाली.
४घाऊक बाजारात १ लिटर दुधाला ६० रुपये असा दर मिळाला. रविवारी कोजागरी पौर्णिमा होती़
४गणेश पेठेतील दूधभट्टीत रविवारी पुणे जिल्ह्यातून मिळून पाच ते सहा
हजार लिटर दुधाची आवक झाली.
४पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी दूध उत्पादन करतात. शहरातील लष्कर भाग, अरण्येश्वर, कात्रज येथे गवळीवाडा आहे.