स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे प्रतिकारशक्तीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:32+5:302021-05-19T04:10:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्या आजूबाजूला हवेत लाखो विषाणू असतात. शरीराची प्रतिकारकशक्ती कमी झाली की विषाणू शरीरावर हल्ला ...

Decreased immunity due to overuse of steroids | स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे प्रतिकारशक्तीत घट

स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे प्रतिकारशक्तीत घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आपल्या आजूबाजूला हवेत लाखो विषाणू असतात. शरीराची प्रतिकारकशक्ती कमी झाली की विषाणू शरीरावर हल्ला करतात. कोरोनाच्या विषाणूने रोगप्रतिकार शक्तीवर केलेला हल्ला आणि उपचारांदरम्यान करण्यात येणारा स्टेरॉइड्सचा अतिवापर यामुळे नव्या विषाणूंशी संबंधित आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे कोणत्याही साथीच्या रोगात आपली प्रतिकारशक्ती हेच शस्त्र आहे, असा इशारा जैवशास्त्रज्ञांनी दिला आहे.

कोरोना काळात म्युकरमायकोसिस, सायटोमेगॅलो व्हायरस अशा काही संसर्गाची नावे नव्याने समोर येत आहेत. पावसाळ्यात विषाणुजन्य आजारांमध्ये वाढ होते. कोरोनाच्या काळात आणखी नवे विषाणू आपल्यासमोर नवीन संकटे निर्माण करणार का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. याबाबत विषाणूतज्ज्ञांशी संपर्क साधून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, रोगप्रतिकारक शक्ती हा कळीचा मुद्दा असल्याचे मत समोर आले.

मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख म्हणाले, ‘‘कोरोना काळात स्टेरॉइड्सचा वापर अवाजवी प्रमाणात करण्यात येत आहे. टास्क फोर्सनेही स्टेरॉइड्सचा जपून वापर करा, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, रुग्ण लवकर बरे व्हावेत, वेगाने प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांकडून अमर्यादित वापर होऊ लागला. त्यामुळे कोरोनापश्चात संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. स्टेरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाली की विषाणू शरीरावर हल्ला करतात. अमेरिका, युकेमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण नगण्य आहे. भारतात मात्र रुग्णांची संख्या वाढते आहे. स्टेरॉइड्सचा वारेमाप वापर कमी झाल्यास पोस्ट कोविड इन्फेक्शनमध्येही घट होईल.’’

------

दिल्लीत २ डीऑक्सी डी ग्लुकोज या औषधाचा वापर सुरू करण्यात आला आहे. साधारणपणे १ जूनपासून सर्वत्र औषधाचा वापर सुरू होईल. यामुळे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होऊ शकेल. स्टेरॉइड्सचा वापरही कमी होईल.

- डॉ. अरविंद देशमुख

----

कोरोना रुग्णांमध्ये इतर संसर्गाचा प्रभाव जास्त आढळून येतो. आपण दुबळे झालो तर शत्रू आपल्यावर हल्ला करतो. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली की विषाणूंचा हल्ला होतो.

- डॉ. मिलिंद वाटवे, जैवशास्त्रज्ञ

Web Title: Decreased immunity due to overuse of steroids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.