नारायणगावमधील १३ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:02+5:302021-01-25T04:11:02+5:30
नारायणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्ट्रीट लाईट व ग्रामपंचायत इमारत १३ ...
नारायणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्ट्रीट लाईट व ग्रामपंचायत इमारत १३ किलोवॅट सौरऊर्जा पथदर्शी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला, अशी माहिती सरपंच योगेश (बाबू) यांनी दिली.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जि. प. सदस्या आशा बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, ग्रामविकास अधिकारी नाईकडे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिका डेरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला.
यावेळी नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे ज्येष्ठ शिवसैनिकांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी एकनाथ शेटे, दिलीप गांजळे, ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अनिल खैरे, ज्ञानेश्वर खळदे, मारुती फुले, रोहिदास तांबे, अरविंद ब्रम्हे, मंगल चिंतामणी, उद्योजक अभय कोठारी, किसन डेरे, ॲड. कुलदीप नलावडे, ॲड. राजेंद्र कोल्हे आदी उपस्थित होते.
सरपंच योगेश पाटे म्हणाले की, या सौरऊर्जा प्रकल्पावर नारायणगाव गावठाण हद्दीतील स्ट्रीट लाईट चालणार असून दर महिन्याला येणार्या जवळपास १ लाख रुपये बिलात सुमारे ५० ते ६० टक्के बचत होणार आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे १० ते १५ हजार रुपयांच्या बिल रकमेची बचत होऊन या रकमेचा सद्पयोग गावच्या विकासासाठी करता येईल . ग्रामपंचायत पातळीवरचा हा सर्वात मोठा स्ट्रिटलाईट व इमारत सौरउर्जा प्रकल्प असल्याची माहिती पाटे यांनी दिली.
आशा बुचके म्हणाल्या की, नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गॅस शवदाहिनी, पाणी पुरवठा योजना, भव्य गार्डन, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवरचा सर्वात मोठा सोलर प्रकल्प असे अनेक पथदर्शी प्रकल्प राबविले जात असुन सरपंच योगेश पाटे यांच्या अधिपत्याखाली नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार केला जातोय ही कौतुकाची बाब आहे. यापुढच्याही काळात अधिक चांगल्या पद्धतीने गावचा विकास होईल असे सांगून ग्रामपंचायतच्या कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले. सरपंच योगेश पाटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
२३ नारायणगाव
१३ किलोवॅट सौरऊर्जा पथदर्शी प्रकल्पाचे लोकार्पण करताना आशा बुचके, संतोष खैरे, दिलीप गांजाळे, नाईकडे , योगेश पाटे, सारिका डेरे व इतर.