उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा आज लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:36+5:302021-08-21T04:14:36+5:30
याबाबत माहिती देताना देवेंद्र शहा म्हणाले, मागील दीड वर्षांपासून मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होते. त्यामुळे अन्य रुग्णांवर ...
याबाबत माहिती देताना देवेंद्र शहा म्हणाले, मागील दीड वर्षांपासून मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होते. त्यामुळे अन्य रुग्णांवर उपचार बंद ठेवण्यात आले होते. आता अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिवनेरी कोविड सेंटर सुरू झाले आहे. तेथे कोरोना रुग्णावर उपचार केले जातात. त्यामुळे मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे पूर्वीप्रमाणेच उपचार सुरू होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती व स्त्रीरोग, नवजात शिशू अतिदक्षता, बालउपचार, अपघातग्रस्तांसाठी अस्थिरोग विभाग, कान नाक घसा, डायलिसिस, नेत्रशस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, दिव्यांग प्रमाणपत्र, रेडिओलॉजी विभाग, एक्स-रे सोनोग्राफी आदी सुविधा उपलब्ध आहेत. या विविध नूतन सुविधांचा लोकार्पण सोहळा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्या सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजीव कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली. दरम्यान, या कार्यक्रमात महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना आयुर्वेदिक होमिओपॅथिक विभाग देवेंद्र शहा फौंडेशनच्या माध्यमातून ३२ लाख रुपये किमतीच्या अत्याधुनिक कार्डिओ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. शासकीय कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोना योद्धा पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात येणार आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयासाठी पाणीपुरवठा करणारी योजना सुरु झाली असून, तिचेही उद्घाटन या वेळी होणार आहे.
--
चौकट
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा उद्या तालुक्यात दिवसभर व्यस्त दौरा राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा तालुक्यात दौरा होणार असून, त्यादृष्टीने अभियांत्रिकी महाविद्यालय व लोकनेते किसनराव बाणखेले यांच्या पुतळ्याच्या परिसराची ते सकाळी साडेनऊ ते दहा या वेळात पाहणी करणार आहेत. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात लोकार्पण सोहळा पार पडेल. दुपारी अडीच वाजता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात वळसे-पाटील नागरिकांच्या भेटीगाठी घेतील. सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक पार पडणार आहे.