डॉ. घैसास यांच्या बचावासाठी आयएमए मैदानात; तातडीने बोलावली डॉक्टरांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:04 IST2025-04-09T09:03:45+5:302025-04-09T09:04:51+5:30

वैद्यकीय समुदायांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

deenanath mangeshkar hospital pune news Indian Medical Association takes to the field to defend Dr. Ghaisas | डॉ. घैसास यांच्या बचावासाठी आयएमए मैदानात; तातडीने बोलावली डॉक्टरांची बैठक

डॉ. घैसास यांच्या बचावासाठी आयएमए मैदानात; तातडीने बोलावली डॉक्टरांची बैठक

पुणे : गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्याने वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. आता इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या बचावासाठी मैदानात उतरली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने तातडीने डॉक्टरांची बैठक बोलावली होती. यात या घटनेतील सहभागी डॉ. घैसास हे रुग्णाच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत करणारे वैद्यकीय सल्लागार होते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची प्राथमिक उपचारांची जबाबदारी घेणे हे त्यांचे कर्तव्य होते. जे त्यांनी कधीही नाकारले नाही. वैद्यकीय तातडीच्या आपत्कालीन परिस्थितीचा खरा अर्थ आणि परिभाषा अधिक स्पष्ट केली जावी. वैद्यकीय आपत्कालीन प्रकरणी उपचार करणाऱ्याचा निर्णय डॉक्टरवर सोडावा, अशा सूचना या अगोदरच केल्या असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

लॉजिस्टिक, बिलिंग, विमा, चॅरिटी इत्यादी विषय रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येतात. सध्याच्या प्रकरणाची तपासणी त्यानुसारच होत आहे. यात हॉस्पिटल आणि वैयक्तिक वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का? याची पडताळणी सुरू आहे.

पुणे महापालिकेने पुण्यातील सर्व रुग्णालयांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नये असे आदेश दिले आहेत. वैद्यकीय संघटनेचे सदस्य पूर्वीपासूनच स्वच्छेने आणि सहानुभूतीपूर्वक याचे पालन करत आहे. महापालिकेचा आदेश चुकीच्या अर्थाने आणि चुकीच्या पद्धतीने वापरून गैरफायदा घेतला जाऊ शकतो. इतर रुग्णांनी रुग्णालय प्रशासनाच्या नियमानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे.

भिसे कुटुंबीयांसोबत सहवेदना आहे. मात्र तपासणी प्रक्रिया सुरू असताना काही संघटनांनी डॉ. घैसास यांच्या रुग्णालयावर हल्ला करून मालमत्तेचे नुकसान केले. तेथे दररोज हजारो रुग्णांना सेवा दिली जाते. झालेला हल्ला हा मानवी सेवांचे विघटन करणारा आहे. आम्ही या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. झालेल्या घटनेने वैद्यकीय समुदायांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने संघटनेच्या पुण्यातील प्रतिनिधीचा कार्यवाहीतील एक भाग म्हणून समावेश करावा. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत.

Web Title: deenanath mangeshkar hospital pune news Indian Medical Association takes to the field to defend Dr. Ghaisas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.