तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 11:59 IST2025-04-20T11:55:37+5:302025-04-20T11:59:23+5:30
- ‘लोकमत’ने गेल्या १७ दिवसांपासून दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी हे प्रकरण लावून धरले होते

तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा उर्फ ईश्वरी उर्फ मोनाली भिसे यांच्यावर उपचार न करता साडेपाच तास तिष्ठत ठेवले. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात उपचारादरम्यान तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. ३१ मार्च रोजी ही घटना घडली.
२ एप्रिल रोजी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शनिवारी (दि. १९) याप्रकरणी डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर वैद्यकीय हलगर्जीपणा (मेडिकल निग्लिजन्स) केल्याचा ठपका ठेवत अलंकार पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
‘लोकमत’ने गेल्या १७ दिवसांपासून दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी हे प्रकरण लावून धरले होते. अखेर ‘लोकमत’ आणि पोलिसांच्या दबावामुळे ससूनच्या वैद्यकीय चौकशी समितीला डॉ. घैसास यांनी वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचे अहवालात स्पष्ट करावे लागले.
अलंकार पोलिस ठाण्यात शनिवारी प्रियंका अक्षय पाटे (२६, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. प्रियंका या तनिषा भिसे यांच्या नणंद आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तत्कालीन डॉ. सुश्रृत घैसास यांना तनिषा भिसे यांची तब्येत क्रिटिकल आसल्याचे माहीत होते. तरी देखील त्यांनी पैशांसाठी आम्हाला व पेशंटला वेठीस धरून पेशंटवर साडेपाच तासांपर्यंत कोणतेही सुवर्णकालीन उपचार (गोल्डन अवर्स ट्रिटमेंट) केले नाहीत. त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली. उपचारासाठी केलेल्या दिरंगाईमुळे पेशंटला जीव गमवावा लागला, असे म्हटले आहे.
तसेच, तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यावर डॉ. घैसास यांनी त्यांना तपासले. त्यांच्यावर लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल. जन्मणाऱ्या बाळांना काचेच्या पेटीत ठेवावे लागेल, त्यासाठी २० लाख रुपये खर्च येईल. तुम्ही १० लाख रुपये अनामत भरा, असे डॉ. घैसास यांनी सांगितले. त्यावर भिसे कुटुंबीयांनी ३ लाख रुपये भरण्यास तयारी दर्शवली होती. परंतु, डॉ. घैसास यांनी सांगितल्याप्रमाणे १० लाख रुपये भरल्याशिवाय ॲडमिट करता येणार नाही, असे सांगून प्रशासनाने पुढील उपचार करण्यास नकार दिला.
शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाचा ड्रेस घातल्यानंतरही त्यांना साडेपाच तास, तसेच ताटकळत ठेवूनही दाखल करून घेतले नाही. गावाकडील जमीन विक्री करून पैसे भरतो, असे भिसे कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले नाहीत.
शेवटी त्यांनी तनिषा यांना ससून आणि त्यानंतर वाकड येथील सूर्या रुग्णालयात दाखल केले. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी बाणेर येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजून ५८ मिनिटांनी तनिषा यांचा मृत्यू झाला.
या प्रकारामुळे पुणे शहरात मोठी खळबळ माजली होती. दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटनांनी आंदोलन करून या घटनेचा निषेध केला होता. महिला आयोगाने देखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. आरोग्य विभागाच्या अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता. मातामृत्यू अन्वेषण समितीने आपला अहवाल तयार केला होता.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशी अहवाल शासनाला दिला होता. त्यानंतर ससून रुग्णालयाने दिलेल्या चौथ्या अहवालात संदिग्ध बाबींचा उल्लेख केला होता. दीनानाथ रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या अहवालांवरून होत होता. अखेर शनिवारी दुपारी अलंकार पोलिस ठाण्यात डॉ. घैसास यांच्या विरोधात वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
ससून रुग्णालयाने पाठवलेला अहवाल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे गुरुवारी (दि. १७) प्राप्त झाला. पोलिसांना दिलेल्या अहवालात डॉ. सुश्रृत घैसास अथवा दीनानाथ रुग्णालय यांच्याबद्दल कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी परत ससूनच्या वैद्यकीय समितीला चार मुद्दे उपस्थित करत त्यावर अभिप्राय मागितला होता. शनिवारी अभिप्राय प्राप्त होताच, पोलिसांना डॉ. घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला.
पोलिसांनी या ४ मुद्द्यांवर मागितला होता अभिप्राय...
- पेशंट क्रिटिकल असताना, उपचारासाठी ऐवढे तास का थांबवले, त्यांना उपचार का दिले नाहीत?
- मुले जन्माला यायची होती, परंतु त्यापूर्वीच त्यांच्याकडे एनआयसीयूच्या नावाने पैसे मागणे योग्य होते का?
- रुग्णाला ऑपरेशनची गरज असताना ५ तास ३० मिनिटे ओपीडीमध्ये का ठेवले. हे अयोग्य नाही का?
- रुग्णालय जर धर्मादाय आहे, तर मृत्यू झालेल्या रुग्णाने यापूर्वी तेथे या योजनेतून उपचार घेतले होते का, हे रुग्णालयाच्या प्रणालीत पाहता आले असते, परंतु ते न पाहता अतिदक्षता विभागाचे उपचार सुरू का केले नाहीत?
डॉक्टरांवर गुन्हा दाखल, रुग्णालयावर देखील कारवाई होणे गरजेचे..
डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर वैद्यकीय हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ज्या रुग्णालयाच्या प्रशासनाचे अनामत पैशांची मागणी लेखी स्वरूपात केली होती, त्या दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनावर अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे आता रुग्णालय प्रशासनावर देखील लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी अभिप्राय प्राप्त होताच गुन्हा दाखल केला आहे. दीनानाथ रुग्णालय प्रशासन अथवा अन्य ३ रुग्णालयांवर कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई केली जाईल. - संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३
आमच्याकडून ससूनच्या चौकशी समितीला ज्या चार मुद्द्यांवर अभिप्राय मागवण्यात आला होता. त्याचा अहवाल आज (शनिवारी) प्राप्त झाला. त्यामध्ये संबंधित डॉक्टरांचा मेडिकल निग्लिजन्स असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त