जननायक अटलजींना रंगावलीतून दीप श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 09:18 PM2018-08-17T21:18:54+5:302018-08-17T21:19:52+5:30
मागील वर्षीपासून अटल कट्टा हा उपक्रम सदाशिव पेठेत सुरु करण्यात आला. दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येथे येऊन त्यांनी पुणेकरांना मार्गदर्शन केले आहे.
पुणे : गंगाजल मे बहती हुूई हमारी अस्थि को, कोई कान लगाकर सुनेगा तो एकही आवाज आएगी... भारत माता की जय, अशा काव्यातून देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करणा-या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना पुण्यामध्ये रंगावलीतून दीपश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अटलजीं ना अनेकदा भेटलेले त्यांचे पुण्यातील स्नेही आणि अटल कट्टयावर दर महिन्याला जमणारे पुणेकर यांनी मोठया संख्येने अटलजींना श्रद्धांजली देण्याकरीता गर्दी केली.
उदय जोशी मित्र परिवारतर्फे सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर मंदिर चौकातील अटल कट्टयावर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना रंगावलीतून दीपश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अटलजींचे स्नेही हरिभाऊ नगरकर,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी, भा.ज.पा. शहराध्यक्ष योगेश गोगावले, रवी अनासपुरे, किशोर शशितल, उदय जोशी, शुभदा जोशी, रामलिंग शिवणगे, किशोर खैराटकर, अजित सुखात्मे, किरण वाईकर, सुनंदा गोरे, शितल जोशी, रोहिनी खैराटकर, अनिल गानू, बाबा शिंदे, आप्पा जोगळेकर आदी उपस्थित होते.रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी ही रंगावली रेखाटली.
हरिभाऊ नगरकर म्हणाले, अटलजींशी अनेकदा दिल्लीसह पुण्यामध्ये देखील भेट झाली. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. देशाचा विचार करणारे ते लोकनेते होते, असेही त्यांनी सांगितले. डॉ.न.म.जोशी म्हणाले, अटलजी पुण्यात आले असताना अनेकदा त्यांची माझी भेट झाली आहे. एकता मासिकासह एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने देखील मी त्यांना भेटलो आहे. तसेच हॉटेल श्रेयसमध्ये त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आहे. योगेश गोगावले म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण निर्माण करण्याची शक्ती होती. त्यांनी दिलेले विचारधन आपण रोजच्या जीवनात अंमलात आणले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदय जोशी म्हणाले, मागील वर्षीपासून अटल कट्टा हा उपक्रम सदाशिव पेठेत सुरु करण्यात आला. दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येथे येऊन त्यांनी पुणेकरांना मार्गदर्शन केले आहे. अटलजींमधील विविध गुणांना नागरिकांसमोर आणून उत्तम सुसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येत आहे.