दोन्ही धरण पाणलोट क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई
By Admin | Published: April 25, 2016 02:40 AM2016-04-25T02:40:13+5:302016-04-25T02:40:13+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत.
भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत. मात्र भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त १२ टक्के तर नीरा देवघर धरणात १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दोन्ही धरण भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे.
टँकरची मागणी करून दीड महिना झाला तरी अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांची व जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
टँकर सुरू करा. अन्यथा हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही धरण भागातील संतप्त नागरिकांनी दिला आहे. भोर तालुक्यात २०१५ मध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरता ७० टक्केच भरली होती. तरीही भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून, यामुळे पाण्याचा खांडवा कुरुंजी गावाच्या खाली आला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दीड महिना असून, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धरणाचा खांडवा मळे गावापर्यंत आला असून, पाणी गावापासून दोन ते तीन किलोमीटरवर गेले आहे. यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असून यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. तर दोन मोटारीमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. मात्र आता धरणात पाणीच नसल्याने टँकरशिवाय कोणताच
पर्याय नाही. (वार्ताहर)