न्यूयॉर्कमध्ये दीपा आंबेकर न्यायाधीशपदी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:01 PM2018-03-27T16:01:06+5:302018-03-27T16:01:06+5:30
लॉ फार्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि त्याहून ७० टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केले़. ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसा नाही, अशा २ हजार गरजूंच्या बाजूने दीपांनी खटले लढविले़.
पुणे : न्यूयॉर्क महानगरातील क्रिमिनल कोर्टच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर यांची १ मे २०१८ पाासून नियुक्ती करण्यात आली आहे़. त्या न्यूयॉर्कमधील पहिल्या महाराष्ट्रीय न्यायाधीश होतील आणि तिसºया भारतीय स्त्री न्यायाधीश असणार आहे.
दीपा आंबेकर या अमेरिकेत स्थानिक झालेल्या प्रज्ञा आणि सुधीर आंबेकर यांच्या कनिष्ठ कन्या आहे. आणि पुण्यातील मान्यवर डॉ़. उप्रेंद वडगावकर यांच्या त्या नात आहेत़.दीपा यांनी युनिव्हर्सिटी आॅफ मिशिगन, अॅन आर्बर विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी़ ए़.ची पदवी मिळविली़ त्यानंतर त्यांनी अमेरीकार्प्समध्ये वर्षभर समाजसेवेचे काम सुरु केले़. त्या काळात त्यांनी अॅटलांटा शहरातील अत्यंत निम्न आर्थिक स्तरातील लोकवस्तीच्या शाळेत शिकवण्याचे काम केले़. तसेच अॅक्सेन्चर या सल्लागार कंपनीत नोकरी स्वीकारली़. पगारातील पैसे वाचवून रटगर्स लॉ स्कुलमध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळविली़. त्याचवेळी न्यूयॉर्कमधील एका अर्ध व्यावसायिक नृत्य कंपनीत नर्तिका म्हणून कार्यक्रम केले होते़. न्यायालयात खटला लढवताना कथाकथन कलेचा वकिलांना कसा उपयोग करुन घेता येईल, याविषयावर त्यांनी भाषणे केली आहेत़.
लॉ फार्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि त्याहून ७० टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केले़. ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसा नाही, अशा २ हजार गरजूंच्या बाजूने दीपांनी खटले लढविले़. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क सिटी कौन्सिल येथे सिनियर लेजिस्लेटिव्ह कौन्सल -वरिष्ठ विधान वकील हे पद मिळवून आपला न्यायव्यवस्थेचा अनुभव अधिक विस्तृत केला़. त्यांचा आजवरचा अनुभव लक्षात घेऊन न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी दीपांची न्यायाधीश पदावर नियुक्ती केली आहे़.