शिक्षकांच्या वेतनापेक्षा मुलांची शिष्यवृत्ती वाढणे महत्त्वाचे- दीपक केसरकर
By दीपक होमकर | Published: October 7, 2022 02:39 PM2022-10-07T14:39:34+5:302022-10-07T14:45:29+5:30
दीपक केसरकर आज पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथील अमृत महोत्सवी सांगता समारंभासाठी आले होते...
पुणे : सध्या राज्यभरात अनेक शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्या शिक्षकांचे समायोजन आधी केली जाईल त्यानंतरच शिक्षक भरती होऊ शकेल. या प्रकारामुळे अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळेल शिवाय त्यातून वाचलेल्या पैशातून मुलांना शिष्यवृत्ती वाढविता येईल. त्यामुळे केवळ शिक्षकांचा वेतन हाच प्रश्न महत्वाचा नाही तर इतर गोष्टीही महत्वाच्या आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
केसरकर आज पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथील अमृत महोत्सवी सांगता समारंभासाठी आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी स्ंवाद साधला त्यावेळी त्यांनी शिक्षक भरती लगेचच होणार नसल्याचे सुतोवाच केले.
केसरकर म्हणाले की, वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी आणि अतिरिक्त शिक्षक यांची माहित घेतली जाईल त्यानंतरच तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल. विद्यार्थ्यांनी अमूक एका ठिकाणी शिक्षण घेतले तरच त्यांची गुणवत्ता वाढते असे नाही त्यामुळे त्यांच्या शाळा बंद झाल्या तरी आसपासच्या शाळेत त्यांचे समायोजन होईल, त्यांना शाळा लांब पडत असेल तर त्यांच्यासाठी बसची व्यव्साथ करण्यात येईल कमी मुलांमध्ये शिकण्यापेक्षा मोठ्या गटात शिक्षण घेतले तर मुलांचा सर्वांगिण विकास होतो त्यांची नेतृत्वगुणाला ते पोषक आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
उध्दव ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली जातील
उध्दव ठाकरे यांच्याबदद्ल आम्हाला आदर आहे मात्र ते दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर जे काही बोलले त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो अखेर माझे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीमध्ये गेल्यावर माझी अस्वस्थता कमी झाली. मात्र उध्दव ठाकरेंनी आमच्याबाबत जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे शिंदे गटाचा प्रवक्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्या सर्व प्रशांची उत्तरे दिली जातील.