दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:14 AM2018-06-28T06:14:14+5:302018-06-28T06:14:16+5:30
कर्मचारी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना बुधवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला
मुंबई : कर्मचारी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना बुधवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
दीपक मानकर यांच्याकडे अनेक वर्ष काम करत असलेले जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी मानकर व संबंधितांवर जगताप याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आणि अटकसत्र सुरू केले. त्यामुळे मानकर यांनी तातडीने पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्या न्यायालयाने ६ जून रोजी मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याला मानकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या तीन विविध खंडपीठांनी मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
जितेंद्र जगताप यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जयेशने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याचे वडील गेली कित्येक वर्ष मानकर यांच्याकडे काम करत होते. मानकर यांच्या जमिनीच्या व्यवहारांचे काम तेच सांभाळत होते. मात्र, गेले काही महिने रास्ता पेठेतील समर्थ पोलीस ठाण्याच्या समोरील जागेवरून वाद निर्माण झाले होते. संबंधित जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर व बिल्डर वसंत कर्नाटकी त्याच्या वडिलांवर दबाव आणत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.