दीपक मानकरांचा जामीन अर्ज फेटाळल्याने अटकेची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:38 PM2018-06-27T14:38:56+5:302018-06-27T14:41:17+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांना कुठल्याहीक्षणी अटक हाेण्याची शक्यता अाहे.
पुणे : पुण्याचे माजी महापाैर तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला अाहे. त्यामुळे मानकरांना अटक हाेण्याची शक्यता असून त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली अाहे.
मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय२८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़ शांतीनगर येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा़ केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक करण्यात आली होती. तर मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याप्रकरणातून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दिपक मानकर यांनी सर्वप्रथम शिवाजीनगर येथील न्यायालयातअर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र तीन खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली हाेती.
बुधवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात अाला अाहे. त्यामुळे मानकरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांना कुठल्याहीक्षणी अटक हाेण्याची शक्यता अाहे.