धबधब्याच्या कपारीत मिळाला दीपकचा मृतदेह
By Admin | Published: June 28, 2015 12:21 AM2015-06-28T00:21:35+5:302015-06-28T00:21:35+5:30
भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळच्या धबधब्यावर बांधलेल्या झुलत्या पुलावर पडलेला मंचर येथील दीपक शंकर खानदेशी या युवकाचा मृतदेह
घोडेगाव : भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळच्या धबधब्यावर बांधलेल्या झुलत्या पुलावर पडलेला मंचर येथील दीपक शंकर खानदेशी या युवकाचा मृतदेह धबधब्याच्या खाली कपारीत ४४ तासांनंतर सापडला. एनडीआरएफच्या जवानांनी तोंडाला आॅक्सिजन मास्क लावून पाण्यात शोध घेतला असता धबधब्याच्या खाली असलेल्या कुंडातील कपारीत दगडांमध्ये त्याचा मृतदेह अडकलेला आढळला.
दि. २५ रोजी दीपक खानदेशी व त्यांचे मित्र भीमाशंकर दर्शन घेऊन कोंढवळ परिसरात फिरायला आले. कोंढवळ गावाजवळ प्रसिद्ध चोंडीचा धबधबा आहे. या धबधब्यावर वन्यजीव विभागाने झुलता पूल, रोप वे तयार केला आहे. दीपक या झुलत्या पुलावरून पलीकडे गेला व पुन्हा येत असताना तोल जाऊन पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्यामुळे तो उंच धबधब्यावरून खाली पडला. यामध्ये तो धबधब्याच्या बाजूला असलेल्या कपारींमधील दगडांमध्ये जाऊन अडकला. हा अपघात दुपारी ४.३०च्या सुमारास घडला.
दि. २६ रोजी मंचर येथील दीपकचे मित्र, ग्रामस्थ, वन्यजीव विभागाचे कर्मचारी व पोलीस यांनी शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा तपास लागला नाही. पोलीस व सर्वच यंत्रणांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण बल म्हणजेच एनडीआरएफच्या टीमला संपर्क साधला होता. या टीमने आज (दि. २७) सकाळी येथे येऊन घडलेल्या घटनेचा आढावा घेतला व सकाळी साडेआकराच्या सुमारास शोधमोहीम सुरू केली.
एनडीआरएफचे निरीक्षक महेंद्र कुमार यांच्यासह ३० जवानांनी जॅकेट, ट्यूब, आॅक्सिजन मास्क यांच्या साह्याने पाण्यात शोध सुरू केला. १२.३०च्या सुमारास धबधब्याचे पाणी पडत असलेल्या ठिकाणी कपारीत खोल पाण्यात तैतीफ अहमद या जवानाला त्याचा मृतदेह आढळून आला. बनवारी, राजू भाई या जवानांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
(वार्ताहर)