Deepti Kale Death Case: दीप्ती काळे मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 11:48 AM2022-04-05T11:48:48+5:302022-04-05T11:49:06+5:30
पुणे : ससून रुग्णालयात दाखल केले असताना, पळून जाताना ८व्या मजल्यावरून पडून दीप्ती काळे हिचा मृत्यू झाला होता. या ...
पुणे : ससून रुग्णालयात दाखल केले असताना, पळून जाताना ८व्या मजल्यावरून पडून दीप्ती काळे हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ज्वेलर्सला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून विश्रामबाग पोलिसांनी दीप्ती सरोज काळे (रा.बावधन) आणि नीलेश उमेश शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. काळे हिच्यावर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तिच्यावर मोक्का कारवाई केली होती. ती आजारी असल्याने तिच्यावर ससून रुग्णालयातील ८व्या मजल्यावर उपचार करण्यात येत होते. २७ एप्रिल, २०२१ रोजी बाथरूमला जाण्याचा बहाणा करून पळून जाताना खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या ताब्यात असल्याने, तिच्या मृत्यूची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येत आहे. या प्रकरणात पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पोलीस महासंचालकांना एक अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये गंभीर नांदी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सीआयडीच्या चौकशीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सीआयडीच्या पथकाने सोमवारी ससून रुग्णालयात जाऊन चौकशी केली. काळे हिला ठेवण्यात आलेल्या वॉर्ड, तिचा मृतदेह सापडलेले ठिकाण, वॉर्डची खिडकी अशा सर्व गोष्टींबाबत सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. एक प्रकारे घटनेची उजळणी करण्याचा प्रयत्न सीआयडीकडून करण्यात आला आहे. या चौकशीनंतर सीआयडी आपला अहवाल सादर करणार आहे. काळेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ती रुग्णालयातून पळून जात असताना इमारतीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.