सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो, पोस्ट टाकून बदनामी; पुण्यात गेल्या ४ महिन्यांत दीड हजार तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 10:59 AM2022-05-16T10:59:08+5:302022-05-16T10:59:58+5:30
विवेक भुसे पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी अटक ...
विवेक भुसे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. गेल्या काही दिवसांत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्याची बदनामी करण्याचा प्रकार वाढत आहे. पुणे सायबर पोलीस ठाण्यात गेल्या ४ महिन्यांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो टाकून बदनामी केल्याच्या दीड हजारांहून अधिक तक्रारी आहेत. त्यात राजकीय व्यक्तींपासून व्यावसायिक, सामान्यांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या प्रेमसंबंधानंतर ब्रेकअप झाल्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करणे, फेसबुक प्रोफाइल हॅक करून खंडणी मागणे, बनावट फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावर आक्षेपार्ह फोटो, मजकूर टाकणे, व्हिडिओ कॉलवर असताना नग्न फोटो, व्हिडिओ तयार करून खंडणी उकळणे, अशा प्रकाराची दिवसेंदिवस वाढ होत आहे. नोकरीवरून काढले म्हणून फेसबुकवर बनावट प्रोफाइलद्वारे त्रास देण्याचा प्रयत्न अनेकदा होताना दिसून येत आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आणि त्यामध्ये इंटरनेट असणे ही आता आवश्यक बाब झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना सोशल मीडियाच्या वापराचे धोकेही पूर्णत: माहिती नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करून त्रास ओढवून घेतल्याच्या घटनाही वाढताना दिसत आहेत.
गोड आवाजात बोलून व्हिडिओ कॉलवर नग्न व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करायचे आणि सोशल मीडिया आणि कुटुंबाला ते पाठवण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्सटॉर्शनचे सर्वाधिक तक्रारी गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात येत आहेत.
गेल्या ४ महिन्यांत फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातून १,१८२ बदनामीच्या तक्रारी आल्या. त्यात ५३० सेक्सटॉर्शनच्या तक्रारी आहेत. त्याखालोखाल फेस प्रोफाइल तयार करून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्याच्या ३८७ तक्रारी आहेत. फेसबुक प्रोफाइल हॅक करून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्याच्या १९० तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून खरेदी- विक्री करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या ७१ तक्रारी आल्या आहेत.
सायबर पोलीस ठाण्यात बदनामीबाबत स्वतंत्र असे हेड नव्हते; पण गेल्या वर्षीपासून राजकीय व्यक्तीची बदनामी केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सायबर पोलिसांनी राजकीय व्यक्तींची बदनामी असे स्वतंत्र हेडच तयार केले आहे. गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत फक्त सायबर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय भारती विद्यापीठ, फरासखाना व इतर पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची बदनामी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या यांची बदनामी केल्याप्रकरणी १६ जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला होता.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी गेल्या वर्षी ५४ जणांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फेसबुक, ट्विटर, व्हॉटसॲपवर आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चार महिन्यांत एक हजार ५१३ तक्रारींची भर
सोशल मीडियावर मजकूर, फोटो, व्हिडिओ टाकून बदनामी केल्याच्या गेल्या वर्षी २०२१ मध्ये सायबर पोलीस ठाण्यात चार हजार ३५७ तक्रारी आल्या होत्या. त्यात फेसबुक/ इंस्टाग्रामविषयी तीन हजार चार तक्रारी होत्या. इतर सोशल साईटविषयी एक हजार ३२३ तक्रारी होत्या. त्यातील अजूनही एक हजार २०४ तपासावर प्रलंबित आहेत. त्यात गेल्या चार महिन्यांत एक हजार ५१३ तक्रारींची भर पडली आहे.
गेल्या चार महिन्यांत सायबर पोलीस ठाण्यात आलेल्या बदनामीबाबतच्या तक्रारी
एकूण तक्रारी - १५१३
फेसबुक/ इंस्टाग्रामवरील तक्रारी - ११८२
सेक्सटार्शनद्वारे बदनामी - ५३०
फेक प्रोफाईल/ बदनामीकारक मजकूर - ३७८
फेसबुक प्रोफाईल हॅक करून मजकूर, फोटो पोस्ट - १९०
व्हॉट्सॲपवर बदनामीकारक मजकूर पोस्ट - ९२