पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी यांचे फोटो मॉर्फ करुन बदनामी; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 06:36 PM2021-05-10T18:36:34+5:302021-05-10T18:37:24+5:30
भाजपाकडून तक्रार; सायबर पोलिसांची धडक कारवाई
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव मोहसीन शेख आणि स्वाभिमानी लोहार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी भाजपा सोशल मीडियाचे पुणे शहर संयोजक विनीत वाजपेयी (वय ३८, रा. साठे वस्ती, लोहगाव) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मोहसीन शेख तसेच शिवाजीराव जावीर यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानाचे मॉर्फ केलेले फोटो वापरुन देशाच्या पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्वाच्या लौकिकाला बाधा आणणारे कृत्य जाणून बूजून करुन त्यांची बदनामी केली आहे. सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.