उत्तर प्रदेशाकडून महाराष्ट्राची हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:55+5:302021-03-16T04:11:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशच्या महिला क्रिकेट संघाने महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात १३ धावांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तर प्रदेशच्या महिला क्रिकेट संघाने महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात १३ धावांनी पराभूत केले.
‘वुमेन्स सिनियर वन डे ट्रॉफी-२०२१’ स्पर्धेचा हा सामना जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर रविवारी (दि. १४) खेळला गेला. या सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. उत्तर प्रदेशने पन्नास षटकांत ४ बाद दोनशे धावा केल्या. हे आव्हान महाराष्ट्राला पेलवले नाही. महाराष्ट्राचा डाव सर्वबाद १८७ धावांवर आटोपला.
उत्तर प्रदेशकडून मधल्या फळीतील निशू चौधरी हिने ३६ चेंडूत ५१ धावांची धमाकेदार खेळी केली. यात तिने पाच चौकार आणि एका षटकाराची आतशबाजी केली. कर्णधार मुस्कान मलिकने ४३ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून उत्कर्षा पवार हिने सर्वात किफायती गोलंदाजी केली. तिने दहा षटकांत फक्त २३ धावा दिल्या. मात्र, तिला बळी टिपता आला नाही. महाराष्ट्राकडून अनुजा पाटील, माया सोनवणे आणि प्रियंका घोडके यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
प्रत्युत्तरात महाराष्ट्राचा डाव १८७ धावांत आटोपला. साली लोणकरने एक बाजू लावून धरत केलेल्या ५९ धावांचा अपवाद वगळता, एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावला नाही. एका मागून एक बळी बाद होत गेल्याने, ४९व्या षटकात महाराष्ट्राचे सर्व फलंदाज तंबूत परतले. उत्तर प्रदेशकडून अनुजा राणी, काजल आणि तनू काला या तिघींनी प्रत्येकी दोन बळी टिपले. या पराभवामुळे महाराष्ट्राला शून्य तर उत्तर प्रदेशाच्या खात्यात चार गुणांची नोंद झाली आहे.
धावफलक
उत्तर प्रदेश : एकता ३६, शोभा देवी ३०, मुस्कान मलिक ४३, आदिती १०, निशू चौधरी नाबाद ५१, अंजली सिंग नाबाद १२, पन्नास षटकांत ४ बाद २०० धावा. प्रियंका गारखेडे, ३-१४. श्रद्धा पोखरकर ४-२७, उत्कर्षा पवार १०-२३, अनुजा पाटील १०-३७-१, मुक्ता मगरे ७-३८, माया सोनवणे ८-३३-१, प्रियंका घोडके ५-१६-१, आदिती गायकवाड ३-११, उत्तर प्रदेश : ५० षटके, ४ बाद २००.
महाराष्ट्र : मुक्ता मगरे ८, ऋतुजा देशमुख १२, शिवाली शिंदे १२, अनुजा पाटील ४, आदिती गायकवाड ३४, प्रियंका घोडके १२, सायली लोणकर ५९, प्रियंका गारखेडे ७, उत्कर्षा पवार १६, माया सोनवणे १३, श्रद्धा पोखरकर नाबाद १. अनुजा राणी १०-३४-२, राशी कनोजिया १०-२८-१, अंजली सिंग १०-३५-१, काजल ९-३४-२, तनू काला १०-५२-२, महाराष्ट्र : ४९ षटके सर्वबाद १८७.