Purandar Vidhan Sabha: २०१९ ला पराभव; शिंदे गटाकडून पुन्हा शिवतारेंना संधी, समोर काँग्रेसचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:37 PM2024-10-28T18:37:32+5:302024-10-28T18:40:07+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पुनरावृत्ती की शिंदे गटाला पुण्यात एक आमदार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये काँग्रेसचे आमदार संजय जगताप विरुद्ध विजय शिवतारे यांच्यामध्ये लढत होणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये पुरंदरमधून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे.
पुरंदर विधानसभा मतदार संघातून २००९ च्या निवडणुकीत विजय शिवतारे शिवसेनेकडून विजयी झाले होते. २०१४ साली सुद्धा त्यांनी चुरशीची लढत देत पुरंदरचा गड पुन्हा एकदा जिंकला होता. मात्र २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंचा पराभव करत विजय मिळवला होता. विजय शिवतारे यांनी शिवसेना पक्षातून निवडणूक लढवली होती. तेव्हा बंडखोरी झाली नव्हती. आता मात्र शिवसेनेचे २ गट पडले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पुनरावृत्ती की शिंदे गटाला पुण्यात एक आमदार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पुणे शहरात मात्र एकही जागा नाही
पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ असून, जागा वाटपात महायुतीमध्ये भाजपला कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला आणि कसबा हे सहा मतदारसंघ आहेत, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडे वडगाव शेरी, हडपसर मतदारसंघ आहेत. हडपसर मतदारसंघ शिंदेसेनेला मिळण्यासाठी प्रयत्न केला जात होता. त्यासाठी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे प्रयत्न करत होते. मात्र, हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदेसेनेला पुण्यात एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.