बारामती शहरातील अतिक्रमणे हटवली
By Admin | Published: August 20, 2016 05:14 AM2016-08-20T05:14:16+5:302016-08-20T05:14:16+5:30
शहरात शुक्रवारी सकाळी नगरपालिका प्रशासनाने वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या वेळी अतिक्रमण केलेले चायनीज, खाद्यपदार्थ, वडापाव-भेळीचे
बारामती : शहरात शुक्रवारी सकाळी नगरपालिका प्रशासनाने वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या वेळी अतिक्रमण केलेले चायनीज, खाद्यपदार्थ, वडापाव-भेळीचे हातगाडे जप्त करण्यात आले. कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पुनावाला गार्डनसमोरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली.
मुख्याधिकारी नीलेश देशमुख, तहसीलदार हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या उपस्थितीत अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली. नगरपालिका प्रशासन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरुवातीला प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. बसपाचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांनी विरोध केला. तसेच सिनेमा रोडवरील पदपथावर व्यापाऱ्यांनी मांडलेल्या मशीन नगरपालिका प्रशासनाने या वेळी जप्त केल्या. या कारवाईबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले, की अडथळ्यांमुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अडथळा ठरणारे हातगाडी आदी काढण्यात आले. फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी नवीन हद्दीत हॉकर्स झोन केले आहेत. त्यामध्ये फेरीवाले, पथारी व्यावसायिकांचे निश्चित पुनर्वसन करण्यात येईल. कारवाई सुरूच राहणार आहे. वाहतूक ठप्प होणारे अडथळे काढताना कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘‘व्यावयायिकांना हटवून अतिक्रमण काढणे चुकीचे आहे. २०१३ मध्ये बारामती नगरपालिकेने १० ‘हॉकर्स झोन’ जाहीर केले होते. त्यातील पहिला हॉकर्स झोनच पुनावाला गार्डनसमोर आहे. २०१३ मध्ये फेरीवाला विधेयक मंजूर करण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला हातगाडी, पथारीवाल्यांना भारतीय संविधानातील कलम १९ (१) नुसार व्यवसायाचा मूलभूत हक्क आहे. कारवाई न थांबल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथारी असोसिएशनच्या वतीने मोर्चा, आंदोलन करण्यात येईल. तसेच न्यायालयाचा दरवाजादेखील ठोठावणार आहे.
- काळुराम चौधरी,
प्रदेश सचिव (बसपा)