संरक्षण दलाची वज्रमुठ आता तीन मित्रांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 04:49 AM2019-12-18T04:49:17+5:302019-12-18T04:49:24+5:30
एनडीएच्या ५६ तुकडीचे विद्यार्थी; एकाच तुकडीतील प्रमुख
निनाद देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताच्या सागरी, हवाई आणि जमिनीवरील सीमांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले तिन्ही दलाचे प्रमुख हे एकाच तुकडीचे विद्यार्थी आहेत. एकाच तुकडीतील अधिकारी तिन्ही दलाचे प्रमुख झाल्याची घटना ा पहिल्यांदाच घडली आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदुरिया, नौदल प्रमुख करमबीर सिंह आणि लवकरच लष्कराप्रमुख होणारे मराठमोळे मनोज नरवणे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिणीच्या जून १९८० च्या ५६ व्या तुकडीचे विद्यार्थी आहेत. यामुळे भविष्यात तिन्ही दलातील समन्वय वाढण्याची अपेक्षा संरक्षण तज्ञांनी व्यक्त केली.
दरवर्षी तिन्ही दलातील अधिकारी वर्षातून दोनदा प्रबोधिनीतून बाहेर पडतात. मात्र, एकाच तुकडीतील तिन्ही दलाचे प्रमुख या होणे हा योगायोग आहे. तिघांनी १९८० मध्ये जूनमध्ये प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिघांनी एअरफोर्स अॅकडमी, नेव्हल अॅकेडमी व इंडियन मिलीटरी अॅकेडमीमधून पुढील प्रशिक्षण पूर्ण केले.
तिघांचे वडीलही होते हवाई दलात अधिकारी
आणखी एक योगायोग पुढे आला आहे. तिघांचेही वडील हे हवाई दलात अधिकारी होते. या योगायोगही पहिलाच असल्याची चर्चा आहे. हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदुरीया, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह आणि लेफ्टनंट जनरल नरवणे हे प्रबोधिनीच्या एकाच तुकडीतील असून चांगले मित्रही आहेत.