संरक्षक कठडे तुटल्याने पूल धोकादायक
By admin | Published: May 4, 2017 01:39 AM2017-05-04T01:39:11+5:302017-05-04T01:39:11+5:30
जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे दळणवळण असलेल्या नारायणगाव- ओझर ते ओतूर या राज्यमार्ग क्रमांक १२८ वरील ठिकेकरवाडी
लक्ष्मण शेरकर / ओझर
जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे दळणवळण असलेल्या नारायणगाव- ओझर ते ओतूर या राज्यमार्ग क्रमांक १२८ वरील ठिकेकरवाडी गावाजवळ पुष्पावती नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. कोणत्याहीक्षणी या ठिकाणी रात्री-अपरात्री मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
या रस्त्यावर नेहमीच रात्री-अपरात्री मोठी वर्दळ असते धनगरवाडी, धालेवाडी तर्फे हवेली, ओझर, तेजेवाडी, शिरोली बुद्रुक, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक या गावांतील लोकांचा प्रमुख वापराचा हा रस्ता आहे. या भागातील शेतकरी वर्ग आपल्या शेतात पिकणारा सर्व प्रकारचा भाजीपाला ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार सामितीत नेण्यासाठी यांच रस्त्याचा नेहमी वापर होत असतो.
अष्टविनायकातील श्रीक्षेत्र ओझर येथे ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातील येणाऱ्या भाविकांच्या छोटी वाहने तसेच लक्झरी बसदेखील यांच मार्गाने येत असतात. या पुलाच्या उत्तर व दक्षिण दिशेला मोठा उतार असल्यामुळे या ठिकाणी पुलावर वाहनांचा वेग वाढलेला असल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.